जिल्हा कॅरम : मुंबईच्या उर्मिला शेंडगेला नमवले
मुंबई : तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात ठाण्याच्या राधिका जोशीने मुंबईच्या उर्मिला शेंडगेचा २-१ असा पराभव करुन जेव्हीपीजी पहिल्या संयुक्त जिल्हा कॅरम स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुसरीकडे पुरुषांच्या गटात अनंत सुर्वे, भरत कोळी, यशवंत कोनडकर यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.जुहु विलेपार्ले जिमखान (जेव्हीपीजी) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिला गेम जिंकल्यानंतर राधिकाला उर्मिलाकडून जबरदस्त टक्कर मिळाली. पहिला गेम सहज जिंकल्यानंतर राधिकाला उर्मिलाच्या वेगवान खेळाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या गेममध्ये एकहाती वर्चस्व राखून उर्मिलाने सामना तिसऱ्या गेममध्ये नेला. यावेळी मात्र राधिकाने सुरुवातीपासून नियंत्रण राखताना उर्मिलावर दबाव टाकत २५-११, ६-२५, २५-१२ असा विजय मिळवला. तसेच मुंबई उपनगरच्या आरती आचरेकर हिनेही विजयी सलामी देताना मुंबई शहरच्या वर्षा पंडितचा १८-२५, २५-११, २५-९ असा पिछाडीवरुन पराभव केला. अन्य एका लढतीत अनुभवी अनुपमा केदारने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना आशा नागपालचे आव्हान २५-१, २५-० असे संपुष्टात आणले.पुरुषांच्या गटात अनंत सुर्वेने सहज विजय मिळवताना गजानन सावंतचा २५-१७, २५-१४ असा पराभव केला. तर भरत कोळीने एकहाची वर्चस्व राखताना मुंबई उपनगरच्या संतोष चव्हाणचा २५-०, २५-९ असा धुव्वा उडवला. पालघरच्या यशवंतनेही सहजपणे आगेकूच करताना भरत सोळंकीचा २५-२, २५-० असा फडशा पाडला. त्याचवेळी तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत शैलेश खरातने झुंजार खेळ करताना रामदास पार्तेचे आव्हान २५-०, ०-२५, २५-० असे संपुष्टात आणले. तर, यानंतरच्या अन्य एका अटीतटीच्या लढतीत ओमकार तिळकने चेतन कोळीचे कडवे आव्हान २५-१४, १२-२५, २५-१३ असे परतावले. (क्रीडा प्रतिनिधी)