Join us

ठाणेकर सर्रास विनाहेल्मेटच?

By admin | Published: February 09, 2016 2:42 AM

विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ९० हजार ६५४ जणांवर गेल्या वर्षभरात (२०१५) ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या २३ युनिटने कारवाई करून ९१ लाख १६ हजार ९०० रुपयांचा

- जितेंद्र कालेकर,  ठाणे विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ९० हजार ६५४ जणांवर गेल्या वर्षभरात (२०१५) ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या २३ युनिटने कारवाई करून ९१ लाख १६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.हेल्मेट परिधान करणे, ही केवळ कायद्याची किंवा न्यायालयाची सक्ती नसून ते तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे आहे, अशी जनजागृतीही वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात केली. २०१४ च्या तुलनेत २०१५ या वर्षात अपघातांचे प्रमाण घटले असले तरी वाहन अपघातात मृत्यू होण्याची संख्या वाढल्याचे उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले. दुचाकीस्वारांच्या अपघातात हेल्मेट घालणाऱ्यांना तुलनेत कमी मार लागल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत, असेही अनेक वाहनचालकांना पटवून दिल्याने त्यांनी हेल्मेट घालण्याचे मान्य केल्याचे नौपाडा विभागाचे पोलीस निरीक्षक ए.एस. मांगले यांनी सांगितले.ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने आयोजिलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमात मराठी कलाकारांसह बॉलीवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन यानेही जनजागृती मोहिमेत हजेरी लावली होती. अभिनेता श्रेयस तळपदे, सचिन खेडेकर आणि जावेद जाफरी यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले होते. नियम पाळल्याने अपघात तर कमी होतीलच, शिवाय तुमचे प्राणही वाचतील, अशी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले होते. त्या वेळीही हेल्मेट घालणे कसे आवश्यक आहे, हे श्रेयस तळपदे याने स्वत:च्याच उदाहरणांसह पटवून दिले होते.नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूचवाहतूक शाखेने ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागांच्या सहायक आयुक्तांच्या अधिपत्याखालील ठाणेनगर, कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, राबोडी, कासारवडवली, कळवा, मुंब्रा, कोनगाव, डोंबिवली, कोळसेवाडी आणि अंबरनाथ आदी युनिटमधील ४६ पथकांमार्फत विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्यांसह अन्य वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरही कारवाई केली आहे.ती यापुढेही राबविणार असल्याचे ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त पुलकेशिन मठाधिकारी यांनी सांगितले. या मोहिमेला पुण्यात काहीसा विरोध झाला असला तरी ठाण्यात या कारवाईचे अनेकांनी स्वागत करून हेल्मेट घालूनच दुचाकी चालवणार असल्याचे सांगितले. तर, काहींनी चालकाच्या मागे बसणाऱ्यांवरही हेल्मेट सक्तीवर आक्षेप घेतल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.