खासगी बसेसमुळे ठाणेकर वेठीस
By admin | Published: February 25, 2015 10:38 PM2015-02-25T22:38:55+5:302015-02-25T22:38:55+5:30
रस्त्याच्या मधोमध अथवा रस्त्याच्या कडेला बस उभ्या करून सार्वजनिक परिवहन सेवेचे प्रवासी पळविणाऱ्या घोडबंदर मार्गावरील खाजगी बसचालकांचा
ठाणे : रस्त्याच्या मधोमध अथवा रस्त्याच्या कडेला बस उभ्या करून सार्वजनिक परिवहन सेवेचे प्रवासी पळविणाऱ्या घोडबंदर मार्गावरील खाजगी बसचालकांचा उद्धटपणा आता आणखीनच वाढला आहे. त्यांच्या या अरेरावीमुळे तीनहात
नाका, नितीन, कॅडबरी आणि घोडबंदर मार्गावरील मानपाडा या भागात काही वेळेस वाहतूककोंडी तर होत आहेच, शिवाय किरकोळ अपघातही
घडू लागले आहेत. परंतु, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी
वाहतूक पोलीस आणि आरटीओवाल्यांकडून त्यांचा छुपा पाठिंबा दिला जात आहे.
ठाणे पूर्व ते घोडबंदर येथील ओवळा मार्गापर्यंत ७० ते ७५ खाजगी बस रस्त्यावर धावत आहेत. कोपरीपासून तीनहात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, कासारवडवली, ओवळा अशा या मार्गांवर त्या धावतात.
मानपाड्यापर्यंत १० रुपये आणि पुढे १५ रुपये एवढ्या कमी दरात ठाणेकरांसाठी सध्या या बसचा प्रवास सुखाचा झाला आहे. परंतु, दुसरीकडे इतर वाहनचालकांना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला ही खाजगी बससेवा डोकेदुखी ठरू लागली आहे.
प्रवासी उचलण्याच्या नादात त्यांचे बसचालक कधी रस्त्याच्या मधोमध बस उभ्या करीत आहेत, तर कधी बसथांबा सोडून कुठेही कशाही पद्धतीने त्या उभ्या करीत आहेत. त्यामुळे पाठीमागून वेगात येणाऱ्या इतर वाहनांना मात्र अचानक ब्रेक दाबावा लागत आहे. परंतु, या वेगात अपघात होण्याची भीतीही वाढत आहे. काही वेळेस दुचाकीचालक, फोरव्हीलरवाल्या बरोबर त्यांचे चालक भर रस्त्यातच हुज्जत घालत असल्याचे दिसते.
तीनहात नाका आणि नितीन कंपनी येथे एकामागून एक बस उभ्या राहत आहेत. बसथांब्यावरदेखील त्या उभ्या राहत आहेत. नितीन कंपनीला तर रस्त्यावर वाहतूक पोलीस असतानासुद्धा ते याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसते. परंतु, यामुळे या भागात सायंकाळच्या सुमारास वाहतूककोंडीही होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता माजी महापौर आणि नगरसेवक अशोक वैती यांनी वाहतूक शाखेला पत्र देऊन या बसगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ्
(प्रतिनिधी)