ठाणेकरांना स्मार्ट सिटीचे ‘अमृत’
By admin | Published: July 2, 2015 12:49 AM2015-07-02T00:49:21+5:302015-07-02T00:49:21+5:30
केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अमृत योजना, स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेत सहभागी होण्यासाठी ठाणे महापालिकासुद्धा सज्ज झाली आहे.
ठाणे : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अमृत योजना, स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेत सहभागी होण्यासाठी ठाणे महापालिकासुद्धा सज्ज झाली आहे. त्यानुसार, यासंदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सर्व योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी कशा पद्धतीने काम करता येऊ शकते, याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच या स्मार्ट सिटीसाठी एक विशेष कक्षही महापालिका मुख्यालयात सुरू केला आहे.
या कक्षाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण असून त्यांच्यासमवेत नगर अभियंता रतन अवसरमोल, उपनगर अभियंता अनिल पाटील, कैलास मुंबईकर, रवींद्र खडताळे, दत्तात्रेय मोहिते, उपायुक्त (वृक्ष प्राधिकरण) आदी अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या कक्षामार्फत अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा, भुयारी गटार, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठीची योजना, रस्त्यावरील पदपथ, इंधनविरहित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मल्टी लेव्हल पार्किंग, लहान मुलांसाठी हरितपट्टे, मनोरंजन केंद्र आदी गोष्टींचा यात समावेश आहे. या योजनेत देशातील एकूण ५०० शहरांचा समावेश होणार असून ठाणे महापालिकेचा कृती आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मार्च २०२२ पर्यंत सर्वांसाठी पाणीपुरवठा, शौचालय, अखंड विद्युतपुरवठा आणि इतर सुविधांसह पक्की घरे बांधण्याचा समावेश आहे. यासाठी हाऊसिंग फॉर आॅलचा प्रकल्प अहवाल बनविण्याच्या सूचना उपनगर अभियंता अनिल पाटील यांनी दिल्या आहेत. त्यामध्ये लाभार्थी निश्चिती, घरांची मागणी, अंमलबजावणी कार्यक्रम आणि मार्गदर्शक तत्त्वातील चार उपाययोजनांपैकी कोणत्या योजनेमध्ये विकास करायचा आहे, याबाबत बीएसयूपी कक्ष आणि शहर विकास विभाग यांनी नियोजन
करावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
एकूण पहिल्या वर्षात जाहीर होणाऱ्या पहिल्या २० स्मार्ट सिटीमध्ये समावेश व्हावा, यासाठी सर्वांनीच परिश्रम घ्यावेत, जेणेकरून ठाणे शहरातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा वापर करता येईल, असेही आयुक्तांनी सूचित केले. (प्रतिनिधी)
या योजनेत देशातील एकूण ५०० शहरांचा समावेश होणार असून, ठाणे महापालिकेचा कृती आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या अनुषंगाने केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.
या सूचनांची अंमलबजावणी होऊन कामास त्वरित सुरुवात होण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी एक विशेष कक्षही महापालिका मुख्यालयात सुरू केला आहे.