अजित मांडके, ठाणे पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने यंदा चोख पावले उचलली आहेत. त्यानुसार साथीचे रोग फैलावू पाहणाऱ्या १५० विकासक आणि २८० गॅरेजवाल्यांना नोटीसा बजावल्या आहेत. आरोग्य विभागाने उचललेल्या या पावलामुळेच यंदा साथीचे रोग नियंत्रणात आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरिया आणि डेंग्यू रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यात मलेरियाचे ४३७ तर डेंग्यूचे अवघे ७ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत डेंग्यूचे ४११ तर मलेरीयाचे ५७६ रुग्ण आढळले होते. यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता.मलेरीया आणि काविळ, गॅस्ट्रो, लेप्टो, टाईफॉईड, डेंग्यूसारखे आजार पावसाळ्यात वाढत असल्याचे चित्र शहरात दरवर्षी असते. यंदा मात्र आरोग्य विभागाने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच संपूर्ण शहरभर विविध स्वरुपाच्या उपाय करून नवीन बांधकामांच्या आणि उघड्यावर टायर ठेवणाऱ्या गॅरेजवाल्यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडून यासाठी एक फिरते पथक नेमले. या पथकाने आतापर्यंत १५० विकासकांना आणि २८० गॅरेजवाल्यांना आरोग्य विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय साथ रोग आटोक्यात ठेवण्यासाठी २५ आरोग्य केंद्रातून २५ डॉक्टर, ११० परिचारीका असा चमू तैनात ठेवला आहे. तसेच या परिचारकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन रक्ताचे नमुने जमा करून त्यांची तपासणी केली जात आहे. गेल्या वर्षी १ लाख १८ हजार ३९ रक्तांचे नमुने तपासले होते. त्यात संपूर्ण वर्षभरात मलेरीयाचे १९९९ रुग्ण आढळले होते. तर जानेवारी ते जून पर्यंत ५७६ रुग्ण आढळले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. यंदा आतापर्यंत ३१ हजार ८६१ रक्ताचे नमुने तपासले असून त्यातील ४३७ जणांना मलेरीयाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १३५ ने कमी आहे. दुसरीकडे डेंग्यूचे मागील वर्षी पहिल्या सहा महिन्यात ४८८ संशयित रुग्ण आढळले होते. त्यातील ४११ जणांना लागण होऊन एकाचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र अजून तरी या दोन्ही आजारांनी एकाचाही मृत्यू झालेला नाही.नवीन बांधकामांच्या ठिकाणी तसेच उघड्यावर टायर ठेवून काम करणाऱ्या गॅरेजवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाने यंदा मोबाइल टीम तयार केली होती. या टीमने शहरातील विविध ठिकाणी, पाहणी करुन आतापर्यंत नवीन बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचवून आरोग्य धोक्यात आणण्याऱ्या १५० विकासकांना आणि उघड्यावर टायर ठेवणाऱ्या २८० गॅरेजवाल्यांना नोटीसा बजावल्या आहेत. मच्छरांची पैदास वाढू नये आणि मलेरीया व डेंग्यूची साथ आटोक्यात राहावी यासाठी आरोग्य विभागाने गृहनिर्माण संस्थामध्ये पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. यात ६१ हजार २८२ मराठी, १६ हजार ८९ हिंदी भाषेतील पोस्टर ठिकठिकाणी लावले आहेत. शिवाय सार्वजनिक शौचालयांना ६१९ व्हेंट नायलॉन जाळ्या बसविल्या असून शहरातील १८१ खाजगी रुग्णालयांना रुग्णांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.