ठाण्यात मनसेची ‘रौनक’
By admin | Published: April 28, 2015 10:52 PM2015-04-28T22:52:49+5:302015-04-28T22:52:49+5:30
नवनिर्माणाच्या गप्पा मारणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात मात्र भलतीच ‘कामगिरी’ केली आहे.
ठाणे : नवनिर्माणाच्या गप्पा मारणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात मात्र भलतीच ‘कामगिरी’ केली आहे. नितीन कंपनीसमोरील उड्डाणपुलावर आधी ‘वागळे महोत्सवा’चा विनापरवाना फलक झळकविला. तो काढून टाकणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकृत जाहिरात एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या एजन्सीच्या खोपट येथील कार्यालयाचीही तोडफोड केली. याप्रकरणी मनसेचे माजी शहराध्यक्ष हरी माळींसह नऊ जणांविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
‘एमएसआरडीसी’च्या नितीन कंपनी, कॅडबरी नाका, तीनहात नाका आणि माजिवडा नाका येथील उड्डाणपुलांवर जाहिरात प्रसारित करण्याचे अधिकृत टेंडर ‘रौनक’ एजन्सीला मिळाले आहे. रविवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज प्रतिष्ठानच्या वागळे महोत्सवाचे होर्डिंग्ज नितीन कंपनी उड्डाणपुलावर कोणाचीही परवानगी न घेता झळकविले. ते ‘रौनक’च्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी काढले. तेच होर्डिंग्ज घेऊन येत असलेल्या रमेश बीद (२०) आणि ब्रिदेश यादव (२५) या कर्मचाऱ्यांना मनसेच्या आठ ते नऊ कार्यकर्त्यांनी दुपारी ३ च्या सुमारास मारहाण केली. त्यांचे कपडेही फाडले. त्यानंतर, या एजन्सीचे एक संचालक ऋषिकेश ढोले यांना या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार सांगितल्यावर त्यांनाही या कार्यकर्त्यांनी अर्वाच्य शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरही न थांबता त्यांनी या एजन्सीच्या खोपट येथील ‘अमरग्यान इंडस्ट्रीज’मधील कार्यालयात जाऊन तेथील दोन महिलांसह तिघा कर्मचाऱ्यांना बाहेर येण्याचे फर्माविले. त्यानंतर, या कार्यालयाचीही सोडा वॉटरच्या बाटल्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात माजी शहराध्यक्ष हरी माळी, मोरे, विजेंद्र कदम, विश्वजित जाधव आणि साळवी आदी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उड्डाणपुलावर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी एसएसआरडीसीकडे लाखो रुपये वर्षाकाठी जमा करतो. ठाणे महापालिकेलाही त्यापोटी वेगळे पैसे भरावे लागतात. बहुतेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मात्र बेकायदेशीरपणे आमच्या जाहिरात फलकांवर परस्पर जाहिराती लावतात. त्यामुळे आमचे नियमित जाहिरातदार नाहक पैसे कापतात आणि इमेजही खराब होते. आता मनसेनेही बेकायदेशीरपणे होर्डिंग्ज लावले. पुन्हा आमच्याच कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
- ऋषिकेश ढोले, भागीदार,
रौनक एजन्सी