Join us

ठाण्याचा ‘सिंग इज किंग’ आता मुंबईत; इफेड्रिन, कॉल सेंटर प्रकरणात चमकदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 3:46 AM

ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची गेल्या तीन वर्षांतील कारकीर्द चांगलीच गाजली. बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरण असो की, जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाळचोरीचे प्रकरण असो, पोलिसांनी अल्पावधीत आरोपींना जेरबंद केले.

ठाणे : ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची गेल्या तीन वर्षांतील कारकीर्द चांगलीच गाजली. बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरण असो की, जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाळचोरीचे प्रकरण असो, पोलिसांनी अल्पावधीत आरोपींना जेरबंद केले. इफेड्रिन तस्करी आणि बोगस कॉल सेंटरचे रॅकेट, इक्बाल कासकरची अटक, अशा प्रत्येक वेळी ठाणे पोलिसांनी बजावलेल्या चोख भूमिकेमुळे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या कारकिर्दीत ठाणे पोलिसांनी मुंबई पोलिसांनाही मागे टाकले. त्याचीच दखल घेत त्यांना अप्पर पोलीस महासंचालकपदी सोमवारी बढती देण्यात आली.आपल्या अधिपत्याखालील ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांतील तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी चमकदार कामगिरी बजावल्यामुळेच गेल्या तीन वर्षांत गुन्हेगारी पाच टक्क्यांपर्यंत घटली, असा दावा परमवीर यांनी अलीकडेच केला होता.मार्च २०१५ मध्ये पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यापासून सिंग यांनी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. यात महिलांची सुरक्षितता, सोनसाखळी चोरीवरील नियंत्रण, कॉलसेंटरमधून होणारी फसवणूक तसेच शहरासह राज्यभरातील पेट्रोलपंपांतून होणारी ग्राहकांची लूट अशा अनेक प्रकरणांचा भंडाफोड केला. कुख्यात इराणी सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. यात ८० हून अधिक चोरटे जेरबंद केले, तर ३८ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. इफेड्रिन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांना ठाण्यातून पकडल्यानंतर त्याची निर्मिती करणाºया सोलापुरातील कंपनीवर धाड टाकून दोन हजार कोटींचे इफेड्रिन जप्त केले. या प्रकरणामुळे देशविदेशांत ठाणे पोलिसांचे कौतुक झाले. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरचे खंडणी प्रकरण, सीडीआर प्रकरणाचा छडा लावण्यासह आंतरराष्टÑीय कॉलसेंटर प्रकरण आणि ‘चेकमेट’ या वित्तीय संस्थेतील ११ कोटींच्या दरोड्याचा यशस्वी तपास त्यांच्या कार्यकाळात झाला.मनपाच्या सहकार्यानेपोलीस ठाण्यांचे बांधकामठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समन्वयाने टीडीआरचा उपयोग करून पोलीस आयुक्तांनी कासारवडवली, कळवा, डायघर आणि चितळसर या पोलीस ठाण्यांचेबांधकाम केले.

टॅग्स :पोलिस