‘लोकमत आपल्या दारी’चे मानले आभार
By admin | Published: May 31, 2016 03:26 AM2016-05-31T03:26:41+5:302016-05-31T03:26:41+5:30
नागरिकांच्या समस्या मांडण्याचे व्यासपीठ म्हणून ‘लोकमत आपल्या दारी’ या ‘लोकमत’च्या अभिनव उपक्रमाला खारोडी आणि मुंबईतील विविध गावठाणे आणि कोळीवाड्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
मनोहर कुंभेजकर, मुंबई
नागरिकांच्या समस्या मांडण्याचे व्यासपीठ म्हणून ‘लोकमत आपल्या दारी’ या ‘लोकमत’च्या अभिनव उपक्रमाला खारोडी आणि मुंबईतील विविध गावठाणे आणि कोळीवाड्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, येथील रहिवाशांनी उपक्रमाचे कौतुक करत समस्यांना वाचा फोडल्याने ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
मालवणी येथील सेंट अॅन्थोनी चर्चच्या मैदानात ‘सेव्ह अवर लॅण्ड’, ‘वॉच डॉग फाउंडेशन’ आणि ‘द बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे गतआठवड्यातील बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये ‘खारोडी गावठाण झोपाडपट्टी कसे?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध होताच नागरिकांनी त्याचे स्वागत केले. शिवाय सोशल मीडियावरही या विषयावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे येथील समस्यांना वाचा फुटली, अशा अनेक प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या. महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भातील प्रसारित झालेल्या वृत्ताचे फ्लेक्स खारोडीच्या मुख्य रस्त्यावर आणि परिसरात विविध ठिकाणी लावण्यात आल्याचे ग्रॉडफे पिमेंटा आणि डॉल्फी डिसोझा यांनी सांगितले.
‘सेव्ह अवर लॅण्ड’च्या डॉल्फी डिसोझा, गर्ग परेरा, स्टॅन्ली फर्नांडिस, वॉच डॉग फाउंडेशनचे संचालक अॅड. ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा, द बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशनचे ब्रायन परेरा, अॅन्थोनी चर्चचे फादर आॅस्टीन फर्नांडिस, मालवणी बीसीएस युनिटचे शिफ्रा पटेल यांनी ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)विकासाला विरोध नाही. मात्र विरोध न होता विकास झाला पाहिजे; आणि यात भ्रष्टाचार व अन्याय होता कामा नये. येथील अरुंद रस्ता रुंद होत असताना स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे; हे आमचे म्हणणे आहे. एखाद्या प्रकल्पासाठी आमची जमीन घेतली जाणार असेल तर आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे. यात भेदभाव होता कामा नये.
- शिफ्रा पटेल, खारोडी गाव
रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही. पण ते झोपडपट्टीच्या आधारावर होता कामा नये. आमच्या राहण्याची योग्य व्यवस्था झाल्याशिवाय आम्ही आमची घरे देणार नाही.
- न्यानसी गोम्स, खारोडी गावठाण
आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहोत. खारोडी हे माझे जन्मस्थान आहे. आम्ही मुंबईचे मूळ जमीनदार शेतकरी. आम्ही आमच्या जमिनी सरकारला विकासासाठी दिल्या. आता फक्त आमची घरे राहिली आहेत. आता महापालिकेच्या खारोडी गावठाणाचे झोपडपट्टीत रूपांतर केले तर हा आमच्यावर अन्याय होईल; आणि आम्ही गावकरी अन्याय सहन करणार नाही.- अॅन्थोनी ग्रेशियस, खारोडी गावठाण