मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करतानाच मुंबईकरांनी यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणालादेखील हरविले आहे. गणेश विसर्जन करताना कुठेही नियमांचे उल्लंघन होणार नाही; याची काळजी मुंबईकरांनी घेतली आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईचा श्री गणेशोत्सव उत्साहात पण शांततेत साजरा झाला आहे. मुंबईकरांच्या या संयमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून, यंदाच्या गणेशोत्सवाची इतिहास नोंद होईल, असाही दावा केला जात आहे.
गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाची नोंद करण्याचे काम आवाज फाऊंडेशनकडून केले जाते. फाऊंडेशच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या श्री गणेश विसर्जनादरम्यान आवाजाची नोंद घेतली आहे. या नोंदीत वाहतूकच्या आवाजाची नोंद झाली असून, कुठेच वाद्य वृंदांचा वापर करण्यात आलेला नाही, असे फाऊंडेशनने म्हटले आहे. मुंबईतील आवाजाच्या नोंद रात्री आठ नंतर घेण्यात आल्या आहेत. खार दांडा, खार जिमखाना, जुहू कोळीवाडा, सांताक्रूझ, शिवाजी पार्क, प्रभादेवी, गिरगाव चौपाटी या परिसरात या नोंदी घेण्यात आल्या आहेत. येथे कुठेच विसर्जनावेळी ध्वनी प्रदूषण झाल्याची नोंद नाही. जो काही आवाज नोंदविण्यात आला आहे तो वाहतूकीचा आहे. शिवाय सार्वजनिक मंडळांनीदेखील कुठेच नाशिक ढोल, ढोल ताशा, डिजे याचा वापर केला नाही. विशेषत: विसर्जन स्थळी तैनात असलेल्या पोलीस आणि महापालिकेने देखील सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर केला नाही. दरम्यान, वाहतूकीच्या आवाजाची नोंद बहुतांश ठिकाणी सरासरी ६० ते ६५ डेसिबलच्या आसपास झाली आहे. तर मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास नवी प्रभादेवी मार्ग येथे फटाक्यांचा आवाज ९४ डेसिबल एवढा नोंदविण्यात आला.