Join us

'मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार'; पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया

By मुकेश चव्हाण | Published: October 23, 2020 6:34 PM

अर्जून खोतकर यांच्या या विधानावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई/ जालना: एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपाला उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी ऑफर शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली होती. 

अर्जून खोतकर यांच्या या विधानावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल अर्जून खोतकर यांचे आभार मानले आहेत. तसेच एकनाथ खडसे यांच्याबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या की, एकनाथ खडसे तथा नाथाभाऊंच्या जाण्याने वेदना मला प्रचंड वेदना झाल्या. जालना जिल्ह्यातील वडी गोद्री भागात आल्या होत्या तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. 

दरम्यान,  भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. 

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. 

४० वर्षात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही, कोणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे. भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू, असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे देखील एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. 

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावेळी तेही म्हणाले की, नाथाभाऊ आता तुम्हाला इथे भवितव्य नाही. पक्ष बदलायचा तर बदला, राष्ट्रवादीत जा, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

खडसेंचा वापर राज्यासाठी करावा, भाजपासाठी नव्हे – भाजपा

एकनाथ खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा, विकासकामे करण्यासाठी करावा, विरोधकांसाठी नव्हे. एकनाथ खडसेंच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होईल ती भरून काढण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत, उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी होणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला आहे.

टॅग्स :पंकजा मुंडेअर्जुन खोतकरएकनाथ खडसेभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार