थँक्यू, साहेब; उत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्नहर्त्यांना सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 01:21 PM2023-09-30T13:21:55+5:302023-09-30T13:23:03+5:30
अनंत चतुर्थीला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दलाकडून २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मुंबई
अनंत चतुर्थीला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दलाकडून २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. उत्सव शांततेत पार पडल्याने पोलिसांच्या कार्याला सलाम करण्यात येत आहे. 'गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा करुन गणेशभक्तांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला जड अं:तकरणाने निरोप दिला. या काळात मुंबई रोषणाईने, आनंदाने आणि एकात्मतेने बहरुन गेली होती. हे उत्सवाचे दिवस सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू' या मुंबई पोलिसांच्या ट्विटने सोशल मीडियावरही मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे.
मुंबईत छोटे मोठे नोंदणीकृत ३ हजार मंडळं आहेत. मात्र आज गल्लोगल्ली बाप्पाची मूर्ती आणून उत्सव साजरा होता आहे. या उत्सवादरम्यान कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सर्वस्तरावर लक्ष ठेवून होते. मुंबईत लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी, अंधेरी, चिंचपोकळी, विलेपार्ले, डोंगरी, उमरखाडीसह अनेक ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. गणेशोत्सव काळात पोलिसांनी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावले. विसर्जनाच्या दिवशीही २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.
दहा दिवस ना सुटी, ना घरची आठवण
गेले दहा दिवस मुंबई पोलीस अहोरात्र बाप्पाच्या बंदोबस्तात सज्जे होते. घरच्या बाप्पाला बंदोबस्ताच्या ठिकाणाहून नमस्कार करत ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. याच दरम्यान एक पोलीस घरच्या बाप्पाच्या आरतीसाठी व्हिडिओ कॉलवरुन सहभागी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
निर्विघ्न गणेशोत्सवासाठी अहोरात्र तैनात
१६,२५० पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले होते. ८ अपर पोलीस आयु्त, २५ पोलीस उपायुक्त ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २८६६ पोलीस अधिकारी बंदोबस्तात सहभागी होती.
आयुक्तांकडून शाबासकी
एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तुकाराम महाराजांच्या या ओळी प्रत्यक्ष अमलात आणून नागरिकांचे सण उत्सव आनंदात साजरे व्हावेत यासाठी सर्व पोलीस कर्मचारी व सुरक्षा दल यांनी घेतलेल्या मेहनतीचे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ट्विट करत कौतुक केले.