लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्था कोविडच्या प्रादुर्भावामुळे बंद असल्यातरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यामध्ये कोविडच्या संकटातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळांमध्ये शिक्षक वर्ग अध्यापनाचे कार्य अव्याहत करत आहे. या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर म्हणजे "शिक्षक दिन "या शिक्षण दिनाचे औचित्य साधून राज्यातील शिक्षण विभागातर्फे शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविण्यात येणार आहे.
कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमित सुरू करता आलेल्या नाहीत; मात्र अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे, यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समूह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने ०२ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ‘थँक अ टीचर’ अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाइन/ऑफलाइन स्वरूपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
अशा कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचे व्हिडिओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्याच्या सूचना शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. यामधील सर्वोत्तम असलेल्या कार्यक्रमापैकी "राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद" महाराष्ट्र (एसीईआरटी) ने जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करावी, तसेच कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत.