मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच; पण राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला देशभरातून दिग्गजांनी हजेरी लावली होती. तर, राज ठाकरेही कुटुंबासमवेत उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मित्र देवेंद्र फडणवीस हेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्यासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही हजर होते. त्यामुळे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील याचे आभार मानले आहेत. हे नाते असेच राहू द्या... असेही राऊत यांनी म्हटलंय.
फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी भेट घेतलीच नाही. शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंना न भेटताच फडणवीस परतले. त्यानंतर, फेसबुक आणि ट्विटरवरुन फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे, का रे दुरावा... असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुळात, भाजपाला सोडून शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवीन घरोबा बसवला आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाण्यामागे सर्वात मोठा रोल हा शिवसेनेचा राहिला. त्यामुळे फडणवीसांच्या मनात कुठंतरी थोडीशी निराशा असेल, म्हणूनच ते उद्धव ठाकरेंची भेट न घेताच परतले. याची चर्चा चांगलीच रंगलीय. संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत याचंही स्वागत केलं. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे मनापासून धन्यवाद मानले.
संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केलंय. ज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधी पक्षच राहणार नाही, अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लावून त्यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.