Join us  

ठाकरेंना धक्का.. दसरा मेळाव्यातील तो बडा नेता 'वर्षा'वर, शिंदे गटात प्रवेश?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 8:24 PM

किर्तीकर यांनी यापूर्वी स्पष्टपणे भूमिका मांडल्याने आता गजानन किर्तीकर हे शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

मुंबई - बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर, राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. तर, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. आता, पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आल्याची माहिती आहे. त्यातूनच या प्रवेशाची चर्चा जोर धरत असून त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. 

किर्तीकर यांनी यापूर्वी स्पष्टपणे भूमिका मांडल्याने आता गजानन किर्तीकर हे शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका मांडताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, आता पुन्हा चूक नको असा सल्लाही जाहीरपणे दिला होता. त्यामुळे, ते शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा रंगली. तत्पूर्वी, खासदार किर्तीकर हे मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनालाही गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आता, पुन्हा एकदा किर्तीकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा जोर धरत आहे.  

ऑपरेशननंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

कीर्तिकर यांचे उजव्या पायाचे दि,१३ जुलै रोजी माहिम येथील रहेजा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले होते. त्यामुळे दि,२१ जुलैला  दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कीर्तिकर यांच्या गोरेगाव ( पूर्व )आरे रोड येथील स्नेहदीप सोसायटी येथील निवासस्थानी भेट देवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या सातत्याच्या भेटीमुळे किर्तीकर शिंदे गटात सहभागी होतील, अशी चर्चा रंगली. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेगजानन कीर्तीकरशिवसेनाउद्धव ठाकरे