मुंबई : झेप्टो या ऑनलाइन अॅपवरून मागविण्यात आलेल्या बटरस्कॉच आइस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर या आइस्क्रीमचा प्रवास डॉ. ब्रेंडन फेरॉव यांच्या घरापर्यंत कसा झाला, याचा तपास मालाड पोलिस करत आहेत. या आइस्क्रीमची निर्मिती उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील लक्ष्मी आइस्क्रीम यांनी केल्याचे स्पष्ट झाले असून गरज पडल्यास पोलिस पथक तिथेही जाऊन तपास करणार आहे.
तक्रारदार डॉ. फेरॉव यांच्या बहिणीने झेप्टो अॅपवरून आइस्क्रीममागविले होते. झेप्टोच्या मालाड पश्चिम येथील शाखेतून ते ग्राहकाकडे पाठविण्यात आले होते. आइस्क्रीम ग्राहकापर्यंत पोहोचवणाऱ्या विक्रेत्याची तसेच झेप्टोच्या मालाड शाखेचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी दिली. आइस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाच्या तुकड्याचा फॉरेन्सिक अहवाल लवकर देण्यात यावा, अशी विनंती न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे केल्याचे अडाणे यांनी सांगितले तर यम्मो कंपनीनेही पोलीस तपासात संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याचे त्यांनी नमूद केले.