लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादरचे येझदीयार एडलबेहराम (७७) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात केअर टेकर मंगल गायकवाडला माटुंगा पोलिसांनी नूकतीच अटक केली. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
दादर येथील घटालिया मेन्शनमध्ये एडलबेहराम एकटे राहत होते. त्यांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या मंगल गायकवाडने दोन लग्ने झाली असतानाही विधवा असल्याचे सांगून त्यांच्याशी लग्नाचा घाट घालत घराची मालकीण होण्याचे स्वप्न रंगविले. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी एडलबेहराम यांची तब्येत बिघडली असल्याचे सांगत मंगल त्यांना घेऊन केईएम रुग्णालयात गेली. तेव्हा तेथील डॉक्टरांनी एडलबेहराम यांना मृत घोषित केले. मृतदेह केईएम रुग्णालयातील ड्युटीवरील पोलीस अंमलदाराच्या ताब्यात दिला. पोलिसांनी याबाबत माटुंगा पोलिसांना कळवून चौकशीचे आदेश दिले. मात्र, मंगलने ५०० रुपये देऊन खासगी डॉक्टरांकडून नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. यामुळे शवविच्छेदन झाले नसल्याने त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
पैसे नाही म्हणत रुग्णालयात नेले नाहीnएडलबेहराम यांची मुलगी नताशा सेठना यांनी फॅमिली डॉक्टरकडे चौकशी केली असता ५ तारखेला एडलबेहराम यांना तपासण्यासाठी घरी आलेल्या डॉक्टरांंना ते जखमी अवस्थेत दिसले. nएडलबेहराम हे घरातील बाथरुमध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या छातीला आणि डोक्याला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र, मंगलने पैसे नसल्याचे सांगत सरकारी रुग्णालयात दाखल करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांना दाखल केले नसल्याचेही समोर आले आहे.
एकाकी ज्येष्ठाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करणारे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते.
प्राथमिक तपासात त्यांच्या उपचारात हलगर्जीपणा दाखविल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. त्यानुसार, वर्षभराने तिच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.