Join us

‘तो’ पदपथ झाला फेरीवालामुक्त; कांदिवली पूर्व येथे पालिका प्रशासनाने केली धडक कारवाई

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 4, 2025 15:04 IST

या वृत्ताची दखल घेत आर दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त  मनीष साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई करत पदपथ फेरीवालामुक्त केला.

मनोहर कुंभेजकर -मुंबई: कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये फेरीवाल्यांनी पदपथाचा ताबा घेतला होता. यासंबंधीचे वृत्त दैनिक लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आर दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त  मनीष साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई करत पदपथ फेरीवालामुक्त केला.

येथील हायवे ते पोईसरपर्यंत तसेच पंजाब नॅशनल बँक ते साई हॉस्पिटल ९० फूट रोड  रस्त्यावरील पदपथाचा ताबा फेरीवाल्यांनी घेतला होता.यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालता येत नाही. ज्येष्ठांना चालताना कसरत करावी लागत होती. अनेकदा अपघाताच्या घटनाही झाल्या होत्या. याबाबत लोकमतच्या दि. २७ डिसेंबरच्या अंकात ‘कांदिवलीतील फूटपाथवर फेरीवाल्यांचा मुक्काम कायम’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

आता बसस्टॉपही दिसतो... - या फेरीवाल्यांबाबत सहायक आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई होत नसल्याने नागरिक हतबल झाले होते.- लोकमतच्या वृत्ताने आर दक्षिण विभागाने शुक्रवारी सकाळी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करत फुटपाथ फेरीवालमुक्त केला. - विशेष म्हणजे येथील बसस्टॉपवरचे अतिक्रमणही काढले.  आता बसस्टॉप दिसतो, अशी माहिती आशानगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरल सोसायटीचे सदस्य सुदेश रासकर यांनी लोकमतला दिली. - आजच्या कारवाईबद्दल नागरिकांनी लोकमत व सहायक आयुक्त  मनीष साळवे यांचे आभार मानले. 

परवाना आणि आरोग्य खात्याकडून येथे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जाते. सकाळपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली. यापुढे येथे फेरीवाले बसणार नाही यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. - मनीष साळवे, सहायक आयुक्त, आर. दक्षिण विभाग 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका