Eknath Shinde: तो देव पहिल्या शिवसेना भवनातच, शिंदेगटाला राष्ट्रवादीचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 11:03 AM2022-08-13T11:03:42+5:302022-08-13T11:04:02+5:30
शिवसेनेला शह देण्यासाठी आता शिंदे गटही सरसावला असून दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे
मुंबई - दादरमधील शिवसेनेचे पाच मजली कार्यालय म्हणजे शिवसेना भवन. बाळासाहेबांचा फोटो असलेली अन् बातम्यांमध्ये सातत्याने झळकणारी ही इमारत सध्या केंद्रस्थानी आहे. राज्याच्या राजकारणात घडलेल्या सत्तांतरामुळे हे भवन देशभरात चर्चेचा विषय आहे. शिवसेनेला दिशा देणारे अनेक निर्णय, घोषणा आधी बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरेंनी केल्या. मात्र, आता शिवसेनेतून फारकत घेतल्यानंतर आता शिंदेगटाने प्रतिशिवसेना भवन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिशिवसेना भवनाच्या मुद्द्यावरुन शिंदे गटाला टोला लगावला आहे.
शिवसेनेला शह देण्यासाठी आता शिंदे गटही सरसावला असून दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. दादरमध्ये आपल्या पक्षाचे प्रशस्त कार्यालय असावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. मुंबईतील लोकांना एकनाथ शिंदेंना भेटता यावे, त्यांच्या समस्या मांडता याव्यात यासाठी हे प्रशस्त कार्यालय शिवसेना भवनाजवळच उभे केले जाणार असल्याचे शिंद गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्हटलं. त्यानंतर, हा मुद्दा चर्चेत आहेत. याबाबत, जयंत पाटील यांनी प्रतिशिवसेना भवन बांधाल पण खरा देव त्याच शिवसेना भवनात असल्याची प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे यांची ताकद मोठी आहे. सुरत, गुवाहाटीला त्यांनी ताकद दाखवली आहे. त्यामुळे प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो, तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे. महाराष्ट्रात शिवसैनिक हे विसरणार नाहीत, असं पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी प्रति शिवसेनाभवनाच्या मुद्द्यावरुन शिंदेगटाला एकप्रकारे टोलाच लगावला आहे.
आमदार-खासदार गेले, पण शिवसैनिक आहे तिथेच
सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या सहा नगरसेविकांनी शुक्रवारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमासाठी ते सोलापुरात आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जयंत पाटील म्हणाले, सरळ चांगले चाललेले सरकार पाडण्याचे काम भाजपने केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठेही हलली नाही. उध्दव ठाकरे यांनी ज्यांना मोठे केले ते जवळचे लोक सोडून गेल्याने ही परिस्थिती ओढवली. मी नांदेड, परभणी इतर जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात मला शिवसेनेचा स्थानिक कार्यकर्ता कुठेही हललेला नसल्याचे दिसून आले. जिल्ह्याचा नेता हलला असेल पण कार्यकर्ता पक्षात आहे. खासदार, आमदार सोडून गेले तरी शिवसेना पक्ष ज्यांना उमेदवारी देतो तोच उमेदवार निवडून येतो ही त्या पक्षाीच परंपरा आहे. ज्यांनी पक्ष सोडून पलायन केले. त्या पुन्हा जनतेत किती स्थान मिळेल याची शंका आहे.
म्हणून दादरमध्येच कार्यालय
शिंदे गट दादरमध्ये आपले मध्यवर्ती कार्यालय उभारणार असला तरी त्यांना या कार्यालयाला शिवसेना भवन नाव देता येणार नाही. शिवसेना भवन, शिवालय, शिवसेना शाखा हे शिवसेनेशी संबंधित शब्द आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यालयाचे नाव काय असेल, याबाबत उत्सुकता आहे. एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतील या कार्यालयाचे नाव ते स्वतःच ठरवणार आहेत. शिवसेना भवनाजवळच शिवाजी पार्क, बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ, माँ साहेबांचा पुतळा, सावरकर स्मारक अशी बाळासाहेबांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे आहेत. त्यामुळेच शिंदे गटाचे कार्यालय याच भागात उभारण्याचा निर्णय घेऊन ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न आहे.
ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया नाही
शिंदे गटाच्या या हालचालींबाबत शिवसेनेतील काही नेत्यांना प्रतिक्रिया विचारली असता, अशा फालतू गोष्टींवर आपण प्रतिक्रिया देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय
दादरमधील मुख्य कार्यालयाबरोबरच शिंदे गटाचे प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय उभे केले जाणार आहे. या कार्यालयात लोकांना आपल्या समस्या घेऊन तिथले शिंदे गटाचे नगरसेवक, आमदार, पदाधिकारी यांना भेटता येईल, अशी यामागची कल्पना आहे. अशा प्रकारे मूळ शिवसेना फोडून शिंदे गट मोठा करण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आहे.