Join us

'तो आमचा विषय नाही'; मनसे अन् शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चांवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 2:05 PM

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई- राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीची चढाओढ सुरू असल्याचं दिसून येत आहे. यातच आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुनही वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देत आता थेट शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यात विशेष म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरेही पाहायला मिळू शकतात अशीही चर्चा आहे. तसेच मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चांही आता रंगू लागली आहे. याचदरम्यान तो आमचा विषय नाही, वरिष्ठ जे आदेश देतील तो आम्ही पाळू, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातही युती होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिंदे यांनी अलीकडेच राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात गणेश दर्शन केले. परंतु त्यावेळी शिंदे-राज यांच्यात काही गप्पाही रंगल्या. राज ठाकरे यांच्या मनसेचा राजकीय पटलावर आकडेवारील मोठा करिश्मा नसला तरी राज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले राज ठाकरे हेदेखील लाखोंच्या सभा सहजपणे भरवून ती गाजवू शकतात. 

दरम्यान, हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा वारसा आम्हीच पुढे घेऊ जाऊ असा दावा मनसे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंकडून केला जात आहे. त्यात दसरा मेळावा कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात आता मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंना दसऱ्याच्या दिवशी जनतेला संबोधित करावं अशी गळ घालण्यात येत आहे. तसेच शिंदे गटातील काही आमदारांकडून राज ठाकरेंना दसरा मेळाव्यात बोलवण्याची मागणी करण्यात येत आहे. 

दसरा मेळावा आमचाच - उद्धव ठाकरे

५६ वर्षांत शिवसेनेने असे ५६ लोक पाहिले. शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथे ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सुनावले. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून संभ्रम-बिंभ्रम अजिबात नाही. दसरा मेळावा आमचाच, म्हणजे शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच (शिवाजी पार्क) होणार. तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक भाग आहे, ते बघूच. पण आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. 

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनाभाजपा