Join us

...म्हणे, या पावसाळ्यात लोकल खोळंबा नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 10:35 AM

मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर सायन, कुर्ला, घाटकोपरपासून पुढील बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या रेल्वे रुळांवर पाणी भरण्यामुळे लोकल कोलमडतात, हा इतिहास आहे.

- सिद्धेश देसाई(सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ)

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू असून, मान्सून काळात लोकल बंद पडणार नाही, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला असला, तरी प्रत्यक्षात मात्र गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेचे सुरू असलेले रडगाणे पाहता, यंदाच्या पावसाळ्यातही लोकलकल्लोळ होण्याची शक्यता अधिक आहे. यंदाही लोकल मान्सूनदरम्यान लटकण्याची चिन्हे आहेत. मात्र, अशी वेळ येऊ नये आणि प्रवाशांना त्रास होऊ नये, म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने सर्व यंत्रणांशी आतापासूनच संवाद साधला पाहिजे.मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर सायन, कुर्ला, घाटकोपरपासून पुढील बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या रेल्वे रुळांवर पाणी भरण्यामुळे लोकल कोलमडतात, हा इतिहास आहे. विशेषत: कुर्ला ते सायनच्या दरम्यानच्या मार्गात मोठे पाणी भरते. मुळात वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या बांधकामामुळे मिठी नदीचे पाणी लालबहादूर शास्त्री मार्गासह रेल्वे रुळांवर येत असून, त्यामुळे लोकल ठप्प पडत आहे.

पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रशासन कितीही प्रयत्न करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासनाला यश येत नाही. कारण केवळ आणि केवळ सायन व कुर्ल्यामध्ये रुळांत पाणी साचल्याने सायन ते सीएसएमटी सेवा पावसाळ्यात बंद पडते. हार्बर मार्गाची अवस्था तर याहून वाईट आहे. रेल्वे रुळांवर साचणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त गळणारी स्थानके ही रेल्वे प्रवाशांनाही नवी नाहीत. घाटकोपर रेल्वे स्थानकांपासून कित्येक स्थानकांवर गळती लागल्याचे प्रवाशांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. रेल्वे प्रशासनाने रेल्वे कल्व्हर्ट साफ केले, झाडांच्या फांद्या कापल्या किंवा देखभाल दुरुस्ती केली, असे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात्र मात्र सिग्नल यंत्रणा कोलमडणार नाही, यासाठी काळजी घेतली पाहिजे. मान्सूनपूर्व कामे वेगाने झाली, म्हणजे सारे काही सुरळीत आहे, असे होत नाही. पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास कमीतकमी वेळेत लोकल पूर्ववत करण्यासाठी योजना आखल्या पाहिजेत.

रेल्वे प्रशासनासाठी पावसाळ्यात सगळे मोठे आव्हान असते ते नाले बंद होऊन ट्रॅकवर पाणी साठल्याने लोकल सेवा ठप्प होणे. या समस्येचे मूळ कारण हे ट्रॅकवर प्रवाशांकडून आणि रेल्वेच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमधून टाकण्यात येणारा कचरा आहे. हा कचरा आणि नाले साफ करून काढण्यात आलेला गाळ उचलण्यासाठी रेल्वेतर्फे स्पेशल ट्रेन चालविण्यात येतात, हे काम नीट झाले पाहिजे. अतिवृष्टीमुळे पाणी साचल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अनेक वेळा रेल्वे सेवा खंडित होते. या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. या यंत्रणेमुळे दोन रेल्वेंमधील वेळही कमी करून रेल्वे सेवा वाढविण्यात मदत मिळू शकेल. या घटकांवर काम केले पाहिजे.

मुळात मध्य रेल्वे, महापालिका किंवा पश्चिम रेल्वे यांच्यात समन्वय नसल्याचे हे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जाहीर करत केलेल्या कामांचा पाढा वाचला आहे. मात्र, पाऊस सुरू झाल्यावर लोकल बंद पडू नये, म्हणून उर्वरित यंत्रणांशी समन्वय साधणे हा कामाचा मोठा भाग आहे. समन्वय साधला नाही तर काय होते? हे प्रवाशांनी ब्लॉक काळात अनुभवले आहे. त्यामुळे बैठका घेणे महत्त्वाचे असले, तरी उर्वरित घटकांकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. तेव्हा कुठे पावसाळ्यात लोकलकल्लोळ होणार नाही.

टॅग्स :मुंबईरेल्वे