‘शिवरायांबाबत बोलत नाही? केवळ शाहू, फुले आंबेडकरांचं नाव घेतो’, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 01:36 PM2022-04-13T13:36:23+5:302022-04-13T13:37:35+5:30
Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. तसेच एखादा नेता वर्ष सहा महिन्यांनी बोलत असेल तर त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला लगावला.
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. तसेच एखादा नेता वर्ष सहा महिन्यांनी बोलत असेल तर त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला लगावला.
शरद पवार हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलत नाही असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी भाषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही असा दावा त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वीच मी अमरावतीचं एक भाषण केलं आहे, त्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर २५ मिनिटांचं भाषण केलं होतं, ते ऐका. मी केवळ शाहू, फुले, आंबेडकर यांच्याबाबतच बोलतो असेही ते म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर ही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आस्था असलेली व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यामुळे या तिघांबाबत उल्लेख करणं हे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्याचाच भाग आहे, असे शरद पवार म्हणाले.
अजून काही मुद्दे आहेत. बाबासाहेब पुरंदरेंसारख्या लेखकांनी शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात दादोजी कोंडदेव यांचे योगदान असल्याचे लेखन केलं होतं. मात्र शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व हे जिजाऊंनी कष्टानं उभं केलं होतं, हे माझं तेव्हा मत होतं आणि आजही आहे. तसेच जेम्स लेनने काही लिखाण केलं त्याची माहिती त्याने पुरंदरेंकडून घेतली होती. त्यामुळे मी टीकाटिप्पणी केली असेल तर मला काही वाटत नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.