Join us

... म्हणून पंकजा मुंडे आजच्या बैठकीला आल्या नाहीत, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 2:21 PM

पंकजा मुंडेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण, कुठल्याही पक्षात जाणार नसून भाजपासाठीच काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं

मुंबई - महाराष्ट्रात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतील अजित पवारांसह ३० हून अधिक आमदार भाजपसोबत सरकारमध्ये आहेत. त्यामुळे, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून जोरदारी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी, आज मुंबईत महाराष्ट्र भाजपची बैठक बोलावण्यात आली, यामध्ये आगामी निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीला भाजपा नेत्या आणि माजी आमदार पंकजा मुंडेंची अनुपस्थिती प्रकर्षणाने जाणवली. त्यावर, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

पंकजा मुंडेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण, कुठल्याही पक्षात जाणार नसून भाजपासाठीच काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, पुढील २ महिने आपण रजा घेत असून सुट्टीवर जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यातच, भाजपची आज महत्त्वाची बैठक मुंबईत बोलावण्यात आली होती. या बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या. त्यावरुन, पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला. त्यावर, त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून पंकजा मुंडेंनी २०२४ च्या महाविजयाचं कामही सुरू केलं आहे. मोदी@9 अभियानांतर्गत त्यांनी लोकसभा मतदारसंघात अनेक कार्यक्रमही घेतले आहेत. माझं कालच पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंशी फोनवरुन बोलणं झालं. त्यांच्या लहान बहिण ज्या वकील आहेत, त्यांच्या पायाल जखम झाली आहे. त्यांच्या पायाची बोटं फॅक्चर झाली आहेत. त्यामुळे, पंकजाताई तिथेच आहेत. म्हणून त्या आजच्या बैठकीला हजर राहिल्या नाहीत, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंबाबत दिले. 

विधानसभेसाठी भाजपचे मिशन १५२ प्लस

भाजपच्या या बैठकीत काही पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले, पहिले पोस्टर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे होते, यामध्ये भाजपने १५२ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत १५२+ जागांवर दावा करणारे देवेंद्र फडणवीस यांचे एक मोठे पोस्टर महाराष्ट्र भाजपच्या बैठकीत दिसले. त्याचबरोबर या पोस्टरमध्ये मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांचाही उल्लेख आहे. पोस्टरमध्ये देवेंद्र फडणवीस १५२+ याकडे बोट दाखवताना दिसत आहेत. आता, भाजपने स्वतःसाठी १५२ हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे, पण आता यासंदर्भात नवीन वाद सुरू होऊ शकतो. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत, त्यामुळे एकटा भाजप १५२ जागांवर दावा करत असेल, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती जागा मिळतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राज्यात आता जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे.  अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जागावाटपावरूनही नवा वाद निर्माण होऊ शकतो. 

टॅग्स :पंकजा मुंडेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईचंद्रशेखर बावनकुळे