त्यांनी वाजवलेले ते शेवटचे शिवतांडव; पखवाजवादक पं. भवानी शंकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 06:23 AM2023-12-31T06:23:01+5:302023-12-31T06:23:58+5:30
भवानी यांनी अचानक घेतलेली एक्झिट संगीतविश्वातील कलाकारांसोबतच त्यांच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे.
मुंबई : चिपळूणमध्ये २५ डिसेंबरला अखेरचे शिवतांडव सादर करीत सुप्रसिद्ध पखवाजवादक पं. भवानी शंकर (६९) यांनी मनाला चटका लावत या जगाचा निरोप घेतला आहे. चतुरंग प्रतिष्ठानचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि चिपळूण केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रंगसोहळा ‘त्रिनाद’ या कार्यक्रमात भवानी यांनी आपल्या अनोख्या पखवाज वादनाने रंग भरले होते. भवानी यांनी अचानक घेतलेली एक्झिट संगीतविश्वातील कलाकारांसोबतच त्यांच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे.
चिपळुणातील कार्यक्रम संपल्यावरच त्यांना थकवा जाणवू लागला होता. सुप्रसिद्ध बासरीवादक रोणू मुजुमदार यांच्यासोबत ते मुंबईत परतले. परंतु संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. भवानी यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मुंबईबाहेर गेलेली त्यांची मुले तत्काळ माघारी परतली. तोपर्यंत फॅमिली डॉक्टरांनी भवानी यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याचे सांगितल्याने मुलगी आणि जावई यांनी त्यांना बोरिवलीतील अजमेरा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण हळूहळू त्यांचे अवयव निकामी होऊ लागले. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास पं. भवानी शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. कमी वयातच निधन झालेल्या त्यांच्या धाकट्या बंधूंच्या चार मुलांचाही सांभाळ भवानी यांनीच केला आहे. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रायोगिक फ्युजनच्या रूपात वेगळी ओळख
भवानी शंकर यांचा जन्म एका संगीतमय कुटुंबात झाला होता. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी पखवाज आणि तबल्याचा अभ्यास सुरू केला. जयपूर घराण्याचे कथ्थक नृत्य तसेच पखवाज आणि तबल्याचे उत्साद पं. बाबूलालजी हे भवानी यांचे पिता आणि गुरू होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी पखवाज आणि तबलावादन सुरू केले.
भवानी यांनी पं. रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, पं. भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया, रोणू मुजुमदार, संतूरवादक शिवकुमार शर्मा, तबलावादक झाकीर हुसेन, अनिंदो चटर्जी यांच्यासह अनेक भारतीय दिग्गज कलाकारांना पखवाजची साथ केली आहे.
मागील काही वर्षांमध्ये त्यांनी सिनेसंगीतकार आणि प्रायोगिक फ्युजन संगीतकाराच्या रूपात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. जी रेमी नामांकन, पंडित जसराज गौरव पुरस्कार, राजस्थान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.