मुंबई - राज्यातील पहाटेच्या शपथविधीचा संपूर्ण पट आता उलगडला असं आपल्याला वाटत आहे. मात्र, अद्यापही अनेक क्लायमॅक्स बाकी असल्याचं दिसून येतं. कारण, अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पहाटेच्या शपथविधीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यातच, यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरुनच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर, शरद पवारांनी आपली बाजू मांडताना ते नाकारले नसून त्यामागील कारण स्पष्ट केले होते. आता, पुन्हा एकदा फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीचा लेटर बॉम्ब टाकत गौप्यस्फोट केला आहे.
पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पिंपरी चिंचवडमध्ये केलं होतं. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल. राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला होता. आता, राष्ट्रपती राजवट उठवण्याची संपूर्ण स्टोरी देवेंद्र फडणवीस यांनी कथन केली. यावेळी, त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलं आणि त्यांच्या सांगण्यानुसारच हे सगळं घडल्याचंही सांगितलं.
राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी आम्ही पहाटेचा शपथविधी केला, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. राष्ट्रपती शासन लावण्याची आयडियाच शरद पवारांची होती. कारण, मी एवढ्या लवकर यु टर्न नाही घेऊ शकत. तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करा, त्यानंतर मी महाराष्ट्र दौरा करतो. त्यानंतर, मी अशी भूमिका घेतो की, महाराष्ट्राला स्थीर सरकार द्यायचं आहे. त्यामुळे, आपण भाजपासोबत जाऊन सरकार बनवत आहोत, त्यामुळे राष्ट्रपती राजवट उठू शकते, असा गौप्यस्फोटच फडणवीसांनी इंडिय टुडेच्या कार्यक्रमातील मुलाखतीत केला.
राष्ट्रपती राजवट लावण्यापूर्वी प्रत्येक पक्षाला पत्र देऊन विचारणा करण्यात येते की, तुम्ही सरकार स्थापन करत आहात का, तसंच लेटर एनसीपीलाही देण्यात आलं होतं. त्याला, आम्ही सरकार बनवत नाहीत, असं उत्तर देणारं राष्ट्रवादीचं लेटर मी टाईप केलं होतं. माझ्याच घरी ते लेटर टाइप करण्यात आलं होतं. त्यामध्ये पवार साहेबांनी काही करेक्शन सांगितले होते, ते करेक्शन दुरूस्त करुन ते पत्र एनसीपीने दिले होते, असा क्लायमॅक्सही फडणवीसांनी आज सांगितला. तसेच, शरद पवार हे मोठे नेते आहेत, ते मोठ-मोठ्या गोष्टी सांगतात. पण सत्य हेच आहे की, शिवसेनेनं आमच्या पाठिंत खंजीर खुपसल्यानंतर शरद पवार हेच आमच्यासोबत सरकार बनवू इच्छित होते, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
अजित पवारांना ५ वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू
शिवसेना आमदारांच्या अपात्रेता याचिकेसंदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, जर हे आमदार अपात्र ठरले तर पर्याय म्हणून अजित पवारांना सोबत घेतलं का, त्यांना पुढील ६ महिने मुख्यमंत्री बनवायचं आहे का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. कारण, मी ६ महिन्यात परिस्थिती बदलून दाखवतो, असे अजित पवार यांनी म्हटल्याचं दाखलाही यावेळी देण्यात आला होता. त्यावर, फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे. ६ महिन्यात परिस्थिती बदलत नसते. त्यामुळे, जेव्हा बनायचंय तेव्हा अजित दादांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, सध्या एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवेळी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांच्याच नेतृत्त्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.