Join us

तुरुंगात 'त्या' बातमीनं संजय राऊतांचं लक्ष वेधून घेतलं; जेलमधील अनुभवावर पुस्तक तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 2:10 PM

तुरुंगातील अनुभवावर पुस्तक तयार आहे. २ पुस्तके लिहिली आहे. वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. मी सतत वाचण्याचा प्रयत्न करत होतो असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - मी तुरुंगात हा विचार करत होतो की 10-12 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर जेलमध्ये कसे राहिले? लोकमान्य टिळक कसे राहिले, आणीबाणीच्या काळात अनेकजण बंदीत कसे राहिले? वर्षोनुवर्ष जेलमध्ये राहतात. मी तर १०० दिवस राहिलो. पण तिथे १ तास शंभर दिवसांचा असतो. अशा परिस्थितीत देशातील राजकीय कैद्यांना राहावं लागतं. पण मी स्वत:ला युद्धकैदी समजतो असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

संजय राऊत यांनी म्हटलं की, तुरुंगातील अनुभवावर पुस्तक तयार आहे. २ पुस्तके लिहिली आहे. वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. मी सतत वाचण्याचा प्रयत्न करत होतो. जे जे मी वाचले आणि पुस्तकातील महत्त्वाच्या गोष्टी मला आवडल्या तेवढ्याच गोष्टी मी माझ्या डायरीत लिहिल्या आहेत. त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. अनेक गोष्टी हल्लीची तरुण पिढी वाचत नाही. इतिहासातील काही नवीन माहिती, राजकीय माहिती असेल असं त्यांनी सांगितले. 

'त्या' बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलंमी तुरुंगात एक बातमी वाचली. केरळमध्ये एका मंदिरात शाकाहारी मगरीचा मृत्यू झाला. अनेक वर्ष ती मगर प्रसादावर जगली. तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मंदिरातील लोकांनी गावातून तिची अंत्ययात्रा काढली. हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्या बातमीनं माझं लक्ष वेधून घेतले अशा अनेक बातम्यांचे मी टिप्पण केलं आहे. तुरुंगातील अनुभवावर पुस्तक लिहिलंय ते येईल. तुरुंगातील जीवन हे एकांतवासातील जीवन आहे. तिथे फक्त उंच भिंती दिसतात. तुम्हाला फक्त भिंत दिसते. माणूस दिसत नाही असं संजय राऊत यांनी सांगितले. 

शिवसेना एकच, नेतृत्व उद्धव ठाकरेंचंआम्ही कितीही मोठे झालो, सर्वोच्च स्थानावर पोहचलो तरी ज्या पक्षानं आम्हाला हे सगळं दिलं. ज्या पक्षाला आम्ही आई मानतो. त्याच्या पाठित खंजीर खुपसणं योग्य नाही. मी एकटा नाही. काल माझ्या सुटकेचा आनंद व्यक्त करण्यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर आले. मला जेलच्या दरवाजातून कारपर्यंत पोहचण्यास अडीच तास लागले. जागोजागी शिवसैनिक जमले होते. हे प्रेम शिवसेनेवरचं आहे आणि शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे. गट वैगेरे नाही. शिवसेना एकच ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायेत असं सांगत राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावला. 

फडणवीसांना भेटणार त्यात चुकीचं काय? महाराष्ट्रातल्या राजकारणातील कटुता संपवावी हे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं आहे. ही राज्यातील संस्कृती आहे. आमची लढाई राजकीय आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्य चालवतायेत त्यामुळे त्यांना भेटणार आहे. मला तुरुंगात असताना अनेक प्रश्न, समस्या जाणवल्या. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ते मांडावे अशी माझी भावना आहे. तुरुंगात गेलेल्या माणसाला जे आयुष्य भोगावं लागतं. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या समस्या मांडायला गेलो तर त्याच चुकीचं काय? ते राज्याचे प्रमुख आहेत असं राऊतांनी स्पष्टीकरण दिले. 

ठाकरे कुटुंबाचे आभार या देशाची घटना गोठवण्याचा प्रयत्न होतोय. आमच्यासारख्या बेकायदेशीर अटक होणे हे राज्यघटना गोठवण्याचा प्रकार आहे. मला आनंद आहे मी माझ्या घरी कुटुंबात आलो. मला भरभरून प्रतिसाद मिळतो. मला सकाळी तेजसचा फोन आला होता. तो बोलला मला भेटायचं आहे. माझं स्मरण सतत ठेवले गेले त्याबद्दल मी ठाकरे कुटुंबियांचा आभारी आहे. आदित्य ठाकरेंच्या हाती मशाल आता पुढे जाईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शिवसेनासंजय राऊततुरुंग