मनोज गडनीस, मुंबई: मुंबईहून व्हिएतनामला निघालेल्या एका विमानातील प्रवाशास ऐन प्रवासादरम्यान ह्रदयविकाराचा झटका आला. मात्र, सुदैवाने त्या विमानातून एक डॉक्टर देखील प्रवास करत असल्यामुळे त्यांनी त्या प्रवाशाला तातडीने मदत केली व त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. ही घटना २७ फेब्रुवारी रोज घडली.प्राप्त माहितीनुसार, व्हिएतनामसाठी मुंबईतून विमानाने उड्डाण केल्यानंतर चाळीस मिनिटांत एका प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका आला.
विमानातील केबिन कर्मचाऱ्यांनी तातडीने ही बाब वैमानिकाच्या निदर्शनास आणून दिली. विमानात एका प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका आला असून विमानात कुणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा वैमानिकाने प्रवाशांमध्ये केली. त्यावेळी डॉ. शशिकांत गजरे नावाचे डॉक्टर त्या विमानातून प्रवास करत होते. त्यांनी तातडीने संबंधित प्रवाशाच्या जागेकडे धाव घेत त्या प्रवाशाला अतितात्काळ लागणारा उपचार (सीपीआर) दिला. जवळपास तीस मिनिटे या रुग्णाला सीपीआर दिल्यानंतर त्याला थोडी शुद्ध आली. दरम्यान, त्याला योग्य उपचार मिळावा यासाठी वैमानिकांनी विमान पुन्हा मुंबईत आणले. त्यानंतर संबंधित रुग्णाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.