"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 01:23 PM2023-10-06T13:23:37+5:302023-10-06T13:28:24+5:30

जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा मिळणारा प्रतिसाद पाहता ते राजकारणात जातील किंवा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होत आहे.

"That path is not ours, no one dares to talk to us like that"; Manoj Jarange Patil spoke clearly about maratha Reservation | "ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

googlenewsNext

मुंबई/सोलापूर - जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या उपोषणला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समजातील तरुणांना भेटून, त्यांच्याशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे. धाराशिव जिल्ह्यानंतर ते सोलापूरात आले होते. त्यानंतर, पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेऊन नेत्यांना सद्बुद्धी दे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू दे, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाकडे केली. यावेळी, त्यांनी मीडियाशीही संवाद साधला. 

जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा मिळणारा प्रतिसाद पाहता ते राजकारणात जातील किंवा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होत आहे. मात्र, राजकीय प्रवेशाच्या चर्चेवर त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. ''माझ्या दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद म्हणजे ती वेदना आहे. सर्वसामान्य मराठा समाज वेदना घेऊन रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्या लेकरांना शिक्षणात, नोकरीत होणारा त्रास, न मिळणाऱ्या सवलतींमुळे हा समाज रस्त्यावर उतरुन पुढे येत आहे,'' असे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील तरुणाईचा तुम्हाला मोठा पाठिंबा मिळतोय, प्रस्थापित नेत्यांना बाजूल सारुन तुमच्या पाठिशी लोक येत आहेत. नेतेमंडळीही तुमच्याभोवती फिरतायंत. मग, तुम्हाला कुठली ऑफर आलीय का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर, पाटील यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. ''ती वाटच आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही. आपली एकच वाट, मराठ्यांना आरक्षण देणे, त्याशिवाय माघार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, सगळे नेते एकत्र या, सत्ताधारी या, विरोधक या. पण मराठ्यांना आरक्षण द्या, असे म्हणत जरांगे पाटील यांनी राजकारणावर भूमिका स्पष्ट केली. 

समाजाशी गद्दारी करु शकत नाही

मी जातीशी गद्दारी करु शकत नाही. ज्याला माय-बाप मानलं त्याच्याशी गद्दारी करायची नसते. मी समाजाशी प्रामाणिकपणा ठेवला आहे, त्यामुळेच कोणी आपल्याकडे बोट दाखवू शकत नाही. मी समाजाचं लेकरू आहे, समाज माझा माय-बाप आहे, म्हणूनच गद्दार शक्य नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी राजकारणात जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतरही अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी काम करेल, पण राजकारणात जाणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. 

ओबीसी नेत्यांनाही इशारा

ओबीसी समाजातील नेत्यांनी मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द काढू नये. आमच्या अनेक पिढ्यांनी तुमच्यावर गुलाल टाकण्याचे काम केले. त्यांचा अवमान होईल असे वागू नका. मला डिवचू नका असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजातील मुलांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नये. पोरं आत्महत्या करणार असतील तर आरक्षण कुणाला द्यायचं आणि कुणासाठी घ्यायचं असा सवालही त्यांनी केला. यावेळी, ओबीसी समाजाने आमची भूमिका समजून घेण्याची गरज असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Web Title: "That path is not ours, no one dares to talk to us like that"; Manoj Jarange Patil spoke clearly about maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.