मुंबई - राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीतील बंडानंतर दोन गट पडले आहेत. मुंबईत या दोन्ही गटाचे आज ऐतिहासिक कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर एकीकडे अजित पवार गटाचा मेळावा पार पडला, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतही मेळावा घेण्यात आला. शरद पवार गटाच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. तर, तिकडे अजित पवारांनी शरद पवारांवर भाष्य करत, त्यांना विनंतीही केली. याशिवाय, परखडपणे आपली भूमिकाही मांडली. भाषणाच्या शेवटी अजित पवारांना ठाण्याचा पठ्ठा म्हणत जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केलं.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात, शिवसेना शिंदे गटाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे वाचनदेखील केले. पॉलिटिकल पार्टी आणि लेजिसलेचर पार्टी एकच नसते. पॉलिटिकल पार्टी आणि लेजिसलेचर पार्टी एक मानली, तर 10व्या शेड्युलला अर्थच राहणार नाही, असं सांगितलं. याशिवाय भाजपावर टीका करताना राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांवरही टीका केली. दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोचरी टीका केली. अजित पवारांनी नाव न घेता, तो ठाण्याचा पठ्ठ्या म्हणत आव्हाड आणि संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे प्रहार केला.
ते आपले दैवतच आहे, मी सांष्टांग नमस्कार करुन विनंती करतो. काही आमदारांची ससेहोलपाट होतं आहे, इकडे आड-तिकडे विहीर, असं झालंय. पण, काही असे लोकं बरोबर घेतले की, त्या संघटनेचं वाटोळं करतील. उदाहरण द्यायचं झालं तर तो ठाण्याचा पठ्ठ्या. त्यांच्यामुळे गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक आपला पक्ष सोडून गेले, सुभाई भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले, वसंत डावखरे मला म्हणायचे, साहेब का म्हणून ह्याला मोठं करतात, असे म्हणत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला.
आपल्यामध्ये जिवाभावाचे कार्यकर्ते असे असले पाहिजे, त्यांनी तिथं नेतृत्त्व केलं पाहिजे. पण, त्याशिवाय तिथे बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. एकेका मंत्र्यांनी ४-४ आमदार निवडून आणले पाहिजे. मी ह्या ९ जणांना सांगितलंय की, तुम्ही चार-चार निवडून आणा, बाकीचं आम्ही बघतो. पण तिथं तर आपले आमदार घालवणाऱ्यालाच मंत्री केलंय. जसं काही काही पक्षाचे प्रवक्ते बोलून चांगल्याचं वजवाटोळं करतात, त्याचप्रमाणे ती व्यक्ती तिथं वजवाटोळं केल्याशिवाय राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे, असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता एकप्रकारे संजय राऊत यांचा दाखला देत जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं.