Join us

‘त्या’ व्हिडीओची होणार एसआयटी चौकशी; आमदारांच्या संतापाची दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 6:24 AM

ठाकरे गटाचे मीडिया को-ऑर्डिनेटर विनायक डावरे याने मातोश्री पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा मॉर्फ केला असल्याचे सरकारतर्फे सोमवारी विधानसभेत सांगण्यात आले. यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी सभागृहात केली. 

 या व्हिडीओच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने निवेदन करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले होते.  हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे सरकारने स्पष्ट केले. फक्त सुर्वे आणि म्हात्रे यांचे राजकीय आणि वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. यामागचे मास्टरमाइंड शोधा, अशी जोरदार मागणी यामिनी जाधव, मनीषा चौधरी, अमित साटम, भारती लव्हेकर या सदस्यांनी केली.

म्हात्रे-सुर्वे संवाद, संभाषणाच्या व्हिडीओत मॉर्फिंग करून अशोभनीय बदल करण्यात आले आणि तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ठाकरे गटाचे मीडिया को-ऑर्डिनेटर विनायक डावरे याने मातोश्री पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर तो इतरांनी सोशल मीडियावर व्हायरल केला, असे सांगत यामागे ठाकरे गट असल्याचे देसाई यांंनी सूचित केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. सूत्रधाराचा शोध घेतला जाईल, असेही देसाई यांनी सभागृहाला सांगितले.

शीतल म्हात्रे यांची पोलिसांत धाव

याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहीसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर चारजणांना अटक करण्यात आली असून, त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. राज प्रकाश सुर्वे यांच्या तक्रारीवरूनही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडिया अकाउंटवरून असा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी केल्याचे दिसून येते. यात चार मोबाइल आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच अटक करण्यात आलेल्यांविरोधात मॉर्फिंग केल्याची कलमे लावण्यात आली असल्याचेही देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्थसंकल्पीय अधिवेशनप्रकाश सुर्वे