...तेच बंडखोर गटाला चोख प्रत्युत्तर ठरेल; अनिल परब शिवसैनिकांसमोर स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 05:26 PM2022-07-25T17:26:12+5:302022-07-25T17:26:39+5:30
सध्या शिवसेनेतून बाहेर पडलेले फुटीर सदस्य आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आमची शिवसेना हिच खरी शिवसेना आहे असे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत.
मुंबई-
सध्या शिवसेनेतून बाहेर पडलेले फुटीर सदस्य आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आमची शिवसेना हिच खरी शिवसेना आहे असे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत. परंतू शिवसेना शाखाप्रमुख तसेच ईतर पुरुष महिला पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करुन सांगीतली पाहिजे. शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपासून जे डावपेच खेळले ते जनतेला समजाऊन सांगावेत. तसेच शिवसेना प्राथमिक सदस्यांची नोंदणी वाढवणे हेच बंडखोरांच्या गटबाजीला चोख प्रत्युत्तर ठरेल, असे माजी परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.
विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांनी शिवसेना विभाग क्र १ मधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबीर मागाठाणे येथील एसपी बॅंक्वेट हॉलमध्ये आयोजित केले होते, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनिल परब बोलत होते.
मुख्यमंत्रीपदी असतांना केलेल्या कामांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कुटुंबप्रमुख अशी प्रतिमा तयार झालेली आहे. त्यामुळे बंडखोर विधानसभा सदस्यांनी भाजपाच्या साथीने शिवसेना फोडण्यासाठी केलेली कृती सर्वसामान्य लोकांना अजिबात आवडलेली नाही. या पाश्वभूमीवर शिवसेना नेते, आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घरोघरी संवाद साधून येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या कशाप्रकारे पार पाडव्यात या संबंधी मार्गदर्शन केले. तर आमदार विलास पोतनीस, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, मागाठाणे विधानसभाप्रमुख उदेश पाटेकर, माजी नगरसेवक संजय घाडी यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माजी नगरसेवक विजय दारुवाले, अशोक नर, मागाठाणे विधानसभा संघटक भास्कर खुरसंगे उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व विभागातील विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन नेमणूक झालेल्या शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. तर मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानपरिषदे तर्फे नामनियुक्त झाल्याबद्दल आमदार विलास पोतनीस यांचा सिनेट सदस्य मिलिंद साटम व शशिकांत झोरे यांच्या वतीने अँड.अनिल परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.