Join us

ठरलं! शरद पवारांची आणखी एक 'महामुलाखत', संजय राऊत विचारणार प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 12:31 PM

पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित एका कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची आणखी एक लक्षणीय मुलाखत घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मुलाखत शिवसेनेचे 'सामना'वीर नेते आणि खासदार संजय राऊत घेणार आहेत. याही मुलाखतीची ठिकाण पुणे हेच असणार आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. शरद पवारांची ही 'राज'कीय मुलाखत प्रचंड गाजली होती. राष्ट्रीय पातळीवर या मुलाखतीची चर्चाही झाली. त्यानंतर, पवार यांचा राऊत यांच्याशी सामना पाहायला मिळणार आहे.  

पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित एका कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज यांच्या प्रश्नांना पवारांनी मनसोक्त उत्तरे दिली. शरद पवार यांची मुलाखत घेताना राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवरील अनेक प्रश्नांची विचारणा केली. यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत दिली. दरम्यान, या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी रॅपिड फायर राऊंड घेत काही झटपट प्रश्नही शरद पवारांना विचारले. या रॅपिड फायर राऊंडमधील शेवटचा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला असता त्या प्रश्नाचे शरद पवार यांच्याकडून उत्तर ऐकण्यास स्वत: राज ठाकरे यांच्यासह उपस्थितांना उत्सुकता लागली होती. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांना विचारलं की, 'राज की उद्धव?', यावर शरद पवारांनी आपल्याच शैलीत उत्तर दिले होते.... ठाकरे कुटुंबीय !. कदाचित पवारांच्या या उत्तरामुळेच आज राष्ट्रवादी आणि शिवसेना आज एकत्र दिसतंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  

राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीनंतर आता पुन्हा एकदा तशीच लोकप्रिय मुलाखत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन करण्यात ज्या दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे, तेच ऐमेकांचा सामना करताना पाहायला मिळणार आहेत. संजय राऊत यांनी आज नागपुरात शरद पवारांची भेट घेतली. या भेटीतही शरद पवारांच्या महामुलाखतीची चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. याच महिन्याच्या अखेरीस, 29 डिसेंबर रोजी या मुलाखतीचं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मुलाखतीचा हा सामना रंगणार असून साहित्यिक कलावंत संमेलनाच्या निमिताने होणाऱ्या कार्यक्रमात ही मेजवाणी पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, यापूर्वी संजय राऊत यांनी लोकमतच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर आता, महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या खलबतींची उकल या मुलाखतीतून होणार आहे. त्यामुळे राऊतांच्या बाणेदार प्रश्नांवर पवारांच्या उत्तरांचा वर्षाव कसा राहिला, आणि या मुलाखतीमधून अद्याप माध्यमासमोर न आलेलं कुठलं सत्य बाहेर येईल, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. आता, महाराष्ट्र या मुलाखतीकडेच डोळे लाऊन बसलेला आहे, असं म्हणता येईल. 

टॅग्स :शरद पवारसंजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनापुणे