- समुद्राने दिला इशारा; नाही तर श्वास घेणेही होईल अवघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भूपृष्ठावरील सजीवांना श्वसनासाठी लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी ९५ टक्के प्राणवायू समुद्रातील अंतर्गत घडामोडीतून तयार होतो. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे सागरातील परिसंस्थेवर परिणाम झाल्याने सृष्टीचे चक्र बिघडले आहे. चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, महापूर अशा अनेक घटनांमुळे त्याचा प्रत्यय आपल्याला आला आहे. हे इशारे ओळखून वेळीच सागरातील अतिहस्तक्षेप न थांबविल्यास मानवाला श्वास घेणेही अवघड होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील किनारपट्टीलगत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. औद्योगिकीकरण व नागरिकरणामुळे जलचरांचा अधिवास धोक्यात आला आहे. प्रदूषण, सिमेंट-काँक्रिटीकरण, अतिरिक्त मासेमारीमुळे सागरी परिसंस्थांना हानी पोहोचत आहे. कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांमुळे पश्चिमेकडील बहुतांश किनारे उद्ध्वस्त झाले आहेत. प्रदूषके आणि कचरा मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडल्याने पाण्याच्या रासायनिक गुणधर्मात बदल होत आहे. मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीसाठी हे घातक असल्याचे मरिन लाइफ ऑफ मुंबईचे संस्थापक प्रदीप पडते यांनी सांगितले.
विकासाच्या नावाखाली कांदळवने तोडली जातात; परंतु त्यांच्या पुनर्वसनाबाबत हालचाली होताना दिसत नाहीत. कांदळवनांमुळेच समुद्र किनाऱ्यांना संरक्षण मिळते. तेथे मासे प्रजननासाठी येतात. समुद्रातील परिसंस्था आणि अन्नसाखळी नियंत्रित करण्याचे कामही ती करतात. त्यामुळे कांदळवने राखली गेली पाहिजेत. शिवाय तेल कंपन्या नैसर्गिक खनिजसाठे शोधण्यासाठी खोल समुद्रात सर्वेक्षण करतात. त्यांच्यावरही नियंत्रण ठेवायला हवे. सीआरझेड कायद्यानुसार पूर्वी किनापट्टीपासून ५०० मीटरच्या आत बांधकामांना परवानगी नव्हती. ती आधी २०० मीटर आणि आता ५० मीटरवर आणण्यात आली. त्यामुळे किनारपट्टी धोक्यात आली आहे. यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास घातक परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिला.
हवामान संतुलनासाठी सागरी परिसंस्था टिकविणे गरजेचे!
- जैविकदृष्ट्या सागरी परिसंस्था महत्त्वाच्या असून, हवामान संतुलनासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.
- सागरी वनस्पतींच्या माध्यमातून महासागराकडून कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषला जातो व ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो.
- सागरी वनस्पती आणि जीवांचे अस्तित्व नसते, तर कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढून पृथ्वीवरील सजीव नष्ट झाले असते. त्यामुळे त्या टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत.
* अन्यथा विपरीत परिणाम भोगावे लागतील
समुद्रात किंवा किनारपट्टीलगत कोणत्याही प्रकल्पांचे नियोजन करताना सागरी परिसंस्थेला धोका पोहोचणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा मानवाला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील.
- प्रदीप पडते, संस्थापक मरिन लाइफ ऑफ मुंबई
सागरी वनस्पती टिकविणे ही प्रत्येकाची जबाबदारी
विकासाच्या नावाखाली सेझच्या नियमांना हरताळ फासणे बरोबर नाही. प्रवाळ (कोरल) ही सर्वाधिक प्राणवायूचे उत्सर्जन करणारी सागरी वनस्पती आहे. मुंबईच्या बहुतांश किनाऱ्यालगत तिचे अस्तित्व आहे, ती टिकविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.
- देवेंद्र तांडेल, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती
....................................................