लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चीनने कोरोनाद्वारे केलेले काम अद्याप संपलेले नाही. चीन हा अमेरिकेला आव्हान देत असून अमेरिकानिर्बंधित संसाधनांचा विकास, संशोधन प्रणालीमधील वाटचाल याद्वारे जगावर अधिक्य राखून आहे. २०५० सालापर्यंत अमेरिकेला मागे टाकण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. त्यासाठीच चीन कोरोनासारखी माध्यमे वापरणार आहे, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल पी.जे.एस. पन्नू यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने रविवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल पी.जे.एस. पन्नू यांच्यात चर्चात्मक कार्यक्रम झाला. यामध्ये महाजन यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांबद्दल पन्नू यांनी तपशीलवार विश्लेषण केले.
पन्नू म्हणाले की, विकास, प्रगत तंत्रज्ञान आणि विना-गतिशील (नॉन कायनॅटिक) आणि प्रत्यक्ष सैन्य संपर्क नसलेल्या (नॉन कॉन्टॅक्ट) युद्धातील भारतीय संरक्षण उद्योगाचे संशोधन यामुळे देशाची क्षमता वाढू शकेल. आम्ही जगातील पहिल्या तीन देशांमध्ये आपली स्थिती आणखी मजबूत करू शकतो. परंतु यासाठी तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन या विषयांवर आपली आर्थिक तरतूद वाढविणे आवश्यक आहे. चीन अमेरिकेपेक्षा अधिक सामर्थ्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करीत आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.
गेल्या दोन वर्षांपासून चीनविरोधात भारत लडाखमध्ये उभा ठाकला आहे. यामागील कारणांवरील चर्चेत एक विशेष गोष्ट दिसू आली की, चीन पूर्णपणे विना-गतिशील, संपर्करहित युद्ध, माहिती युद्ध, प्रचार युद्ध आणि हॅकिंग माइंड अशी साधने वापरत आहे. चीन स्वत:ला गतिहीन युद्धाच्या दिशेने पुढे नेत आहे. हा सायबर हल्ला आहे, त्यातून माहिती मिळवत देशाला राजकीयदृष्ट्या पांगळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकप्रकारे हे माहिती युद्ध, संपर्क नसलेले युद्ध आहे, ज्यामध्ये शत्रूच्या सैन्याला त्यांच्याच देशात पराभूत केले जाते.
....................................