Join us  

...म्हणून केली चिमुकल्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 6:09 AM

नवजात बालक विक्री प्रकरण; दिल्लीतील महिलेसह चौघांना अटक

मुंबई : भाऊ आणि दीराला मुलगा हवा म्हणून दोन मुलांची दोन ते अडीच लाखांत खरेदी करणाऱ्या दिल्लीतील नेहा गुप्तासह चौघांना गुन्हे शाखेने अटक केली. नवजात बालक विक्री प्रकरणात गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने ही कारवाई केलीे. त्यांच्याकडून आणखी दोन बाळांची सुटका केली. त्यामुळे आरोपींचा आकडा १० वर पोहोचला.

पोलिसांच्या माहितीनुसार, यापूर्वी गुन्हे शाखेने सुनंदा मसाने (३०), सविता साळुंखे-चव्हाण (३०), भाग्यश्री भागवत कोळी (२६), आशा उर्फ ललिता जोसेफ (३५) यांच्यासह अमर देसाई आणि भाग्यश्री कदम (४२) यांना अटक केली होती. तपासात या टोळीने केलेल्या दोन व्यवहारांची माहिती पुढे आली. गरीब कुटुंबातील महिलांना हेरून, परिस्थितीमुळे बालकांचे संगोपन कसे शक्य नाही, हे पटवून द्यायचे. त्याऐवजी मुलांना दत्तक देण्याचा पर्याय ठेवून, त्या बदल्यात टोळीने त्यांना एक ते दीड लाख रुपये दिले. पुढे या टोळीने ही बालके अडीच ते चार लाखांना विकली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन बालके ताब्यात घेतली होती. त्यापाठोपाठ कोळीच्या चौकशीतून दिल्लीतील नेहाचा सहभाग उघड झाला. नेहाने तिचा भाऊ अभिनव अग्रवाल, दीर राहुल गुप्ता यांना दोन बालकांची विक्री केली. दोघांना मुलगा हवा होता.

ज्यांच्याकडून मुलांना दत्तक घेतले, त्यापैकी एका महिलेकडे गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली. ती गरीब आहे. तिला एक लाख दिल्याचे समोर आले. नेहा, अभिनव, राहुलला अटक झाली. नेहा गृहिणी आहे. राहुल नोकरदार तर अभिनव हा व्यावसायिक आहे. अशाच प्रकरणात वडाळा, व्ही.पी. रोड पोलीस कोठडीतील जुलैहुमा दळवीचा सहभाग समोर आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.आतापर्यंत एकूण चार बाळांची सुटकाया प्रकरणात आरोपींचा आकडा १० वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत एकूण ४ बाळांची सुटका करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे.