... म्हणून सचिनच 'राईट' पर्सन, फडणवीसांनी सांगितलं किती घेतलं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 03:54 PM2023-05-30T15:54:33+5:302023-05-30T16:07:10+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सचिन तेंडुलकरसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि दिग्गज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवरमहाराष्ट्र सरकारने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. तेंडुलकरची मंगळवारी महाराष्ट्राच्या 'स्वच्छ मुख अभियाना'चा 'स्माइल ॲम्बेसेडर' म्हणून निवड करण्यात आली. खरं तर ही तोंडाच्या स्वच्छतेच्या प्रचाराशी संबंधित एक मोहीम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन तेंडुलकर यांनी ही जबाबदारी स्विकारली त्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं. तर, या जबाबदारीसाठी सचिनच योग्य व्यक्ती का आहेत, हेही सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सचिन तेंडुलकरसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे सचिन तेंडुलकर पुढील पाच वर्षांसाठी या अभियानाचा 'ब्रँड ॲम्बेसेडर' असणार आहे. 'स्वच्छ मुख अभियान' हे 'इंडियन डेंटल असोसिएशन'ने तोंडाची स्वच्छता सुधारण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सुरू केलेले राष्ट्रीय अभियान आहे. यावेळी, भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी सध्या तरुणांमध्ये गुटखा, तंबाखू, खर्रा, यांसारखे पदार्थ खाण्याच्या प्रमाणावर भाष्य केलं. विशेष म्हणजे काही सेलिब्रिटीच या पदार्थांच्या जाहिराती करत असल्याचे त्यांनी नाव न घेता निदर्शनास आणून दिले. तर, याउलट सचिन तेंडुलकर हे कधीही अशाप्रकारच्या जाहिराती करत नाहीत. त्यामुळेच, ते या अभियानाचे अॅम्बेसिडर बनून अतिशय योग्य व्यक्ती असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सचिन तेंडुलकर यांच्यासमवेत राज्य सरकारने स्वच्छ मुख अभियानाचा करार केला आहे. पण, सचिन यांनी यासाठी १ रुपयाही मानधन घेतलं नाही, निशुल्कपणे ते या अभियानात सहभागी झाले आहेत, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो, असेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, सचिनने भाषण करताना सध्या मुख आजाराचे प्रमाण वाढले असून शरिराची फिटनेस म्हणजे फक्त वरुन दिसणारी बॉडी नसून इतरही अनेक गोष्टी असतात. त्यातच, मुख म्हणजे ओरल डिसेज येतात, असे सचिनने सांगितले.
'स्वच्छ मुख अभियान' काय संदेश देतं?
'स्वच्छ मुख अभियान' हे लोकांच्या जनजागृतीसाठी कार्यरत राहणार आहे. यातून प्रमुख पाच संदेश दिले जातील. यामध्ये ब्रश करणे, तोंड स्वच्छ धुणे, स्वच्छ अन्न खाणे, सिगारेट पिणे टाळणे आणि वर्षातून किमान दोनदा दंतचिकित्सकाकडे जाणे हे पाच प्रमुख संदेश या अभियनाअंतर्गत दिले जातील. याचाच प्रचार सचिन तेंडुलकर करणार आहे.