मुंबई-बोरिवली विधानसभा क्षेत्रातील मालाड पश्चिम मनोरी येथे १९ फेब्रुवारी रोजी लागलेल्या भीषण आगीत येथील सुमारे 10 मच्छिमारांच्या 'डोल आणि भोक्सी या प्रकारच्या जाळ्या आणि त्यांच्या सहा शेड्स भस्मसात झाल्या होत्या. याप्रकरणी बोरीवली क्षेत्राचे आमदार सुनील राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या मदतीसाठी पत्रव्यवहार केला होता. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 नुकसानग्रस्तांना मंजूर केलेले 54 लाख रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून उपनगर जिल्ह्याधिकारी यांच्या खात्यात आज वर्ग करण्यात आले. उद्या या 10 मच्छिमारांच्या खात्यात सदर रक्कम थेट उपनगर जिल्हाधिकारी वर्ग करतील अशी माहिती आमदार सुनील राणे यांनी लोकमतला दिली.
आपल्या खात्यात मुख्यमंत्री सहायता निधीतून देय रक्कम जमा होणार असल्याचे वृत्त मनोरी गावात वाऱ्यासारखे पसरले.त्यामुळे येथील मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी सदर मदत मिळवून देण्याबाबत मोलाची भूमिका बजावल्याबद्धल आमदार सुनील राणे यांचे जाहिर आभार मानले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदर घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री घडल्यावर येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली होती आणि मनोरीकरांच्या बोटी या सुमुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या.सदर बाब बोरीवली क्षेत्राचे आमदार सुनील राणे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली होती आणि मनोरीकरांच्या बोटी या सुमुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या.आणि विशेष म्हणजे आम्हाला तातडीची पाच लाखांची मदत त्यांनी आमच्या येथील मच्छिमार संघटनेकडे सुपूर्द केली.
यामुळे आमची रोजी रोटी पुन्हा सुरू झाली आणि लवकर आमच्या बोटी समुद्रात गेल्या अशी माहिती येथील अपादग्रस्त मच्छिमारांनी लोकमतला दिली. विशेष म्हणजे तहसीलदारांनी त्वरित पंचनामा करणे,मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधणे या गोष्टी लवकर पार पाडण्यात आणि सुसूत्रता आणण्यात आमदार सुनील राणे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती अशी माहिती येथील मच्छिमारांनी दिली.