Join us

मुंबईतील १२७ वर्ष जुना बेलासिस पूल पाडणार, नव्यानं बांधला जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 5:20 PM

मुंबईतील आणखी एक ब्रिटीशकालीन जुना पूल पाडण्यात येणार आहे.

मुंबई

मुंबईतील आणखी एक ब्रिटीशकालीन जुना पूल पाडण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील वाहतुकीची धुरा सांभाळणारा १२७ जुना असलेला बेलासिस पूल पाडून त्याजागी नवा पूल उभारला जाणार आहे. रेल्वे हद्दीतील पुलाचं तोडकाम करण्यासाठी निविदा प्रक्रिया सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. तर मुंबई मनपाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी चार महिने लागणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात पूल बंद करुन तोडकाम केलं जाऊ शकतं. 

आयआयटी मुंबई आणि रेल्वे यांच्या संयुक्त पथकानं शहरातील पुलांची संरचनात्मक तपासणी केली होती, तेव्हा हा पूल धोकादायक ठरवण्यात आला होता. या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण केलं जाणार आहे. तर पुलाच्या जोडरस्त्याची उभारणी मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. बेलासिस पूल तोडून नवा पूल उभारणीसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पूल तोडून नव्याने उभारणीसाठी कंत्राटदाराला १८ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. सप्टेंबरअखेर रेल्वे हद्दीतील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितलं.

सन १८९३मध्ये उभारण्यात आलेला बेलासिस पूल आयआयटी-रेल्वे अहवालात धोकादायक ठरवण्यात आला. पूल बंद केल्यानंतर नागरिकांना अधिक त्रास होऊ नये म्हणून दोन्ही यंत्रणांनी एकाचवेळी काम सुरू करण्याची वरिष्ठ पदस्थ अधिकाऱ्यांची भूमिका आहे. यामुळे नव्या वर्षात अर्थात जानेवारी २०२४मध्ये पूल बंद करून त्याचे तोडकाम आणि पुनर्बांधणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबई