१५ जूनला सुरू होणार अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव
By संजय घावरे | Published: June 7, 2024 09:14 PM2024-06-07T21:14:13+5:302024-06-07T21:14:26+5:30
३८ देशांमधून ६५ भाषांमधील १०१८ चित्रपट दाखल
मुंबई - अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईमध्ये १५ जून रोजी सुरू होणार असून, २१ जूनपर्यंत संपणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रसारण सचिव संजय जाजू यांनी आज जाहीर केले. महोत्सवाचे ठिकाण मुंबईतील एफडी-एनएफडीसी कॉम्प्लेक्स असेल आणि मिफचे स्क्रिनिंग दिल्लीत सिरीफोर्ट ऑडिटोरियम, चेन्नईमध्ये टागोर फिल्म सेंटर, पुणे येथे एनएफएआय ऑडिटोरियम आणि कोलकात्यामध्ये एसआरएफटीआय ऑडिटोरियममध्ये होणार आहे.
मुंबई आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करताना जाजू यांच्यासोबत अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, पीआयबीच्या प्रधान महासंचालक शेफाली शरण आणि एफएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार देखील उपस्थित होते. १५ जून रोजी मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे आणि चेन्नई येथे 'बिली अँड मॉली, ॲन अदर लव्ह स्टोरी' या चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन, तर २१ जून रोजी सुवर्ण शंख विजेत्या चित्रपटाने सांगता होईल. स्पर्धा विभागासाठी यंदा ३८ देशांमधून ६५ भाषांमधील १०१८ चित्रपटांच्या एन्ट्रीज आल्या आहेत. २५ आंतरराष्ट्रीय आणि ७७ राष्ट्रीय स्पर्धा विभागांसाठी प्रख्यात चित्रपट तज्ज्ञांच्या तीन निवड समित्यांनी ११८ चित्रपटांची निवड केली आहे. या वर्षी अतिशय उच्च दर्जाचे चित्रपट आले असल्याने निवड करणे कठीण झाल्याचे निवड समितीने सांगितले. यंदा मिफ प्रोग्रामिंगमध्ये एकूण ३१४ चित्रपट दाखवले आहेत. आठ जागतिक प्रीमियर, सहा आंतरराष्ट्रीय प्रीमियर, १७ आशिया प्रीमियर आणि १५ भारत प्रीमियर होणार आहेत.
यंदाच्या महोत्सवासाठी विशेष पॅकेजेस तयार करण्यात आली आहेत. यात ऑस्कर आणि बर्लिनेल पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या पॅकेज प्रत्येकी १२ लघुपट दाखवले जातील. रशिया, जपान, बेलारूस, इटली, इराण, व्हिएतनाम आणि माली या सात देशांच्या सहकार्याने 'स्पेशल कंट्री फोकस पॅकेज' केले आहे. फ्रान्स, स्लोव्हेनिया, अर्जेंटिना आणि ग्रीस या चार देशांमधून ॲनिमेशन पॅकेज तयार केले आहे. देशभरातील नामांकित संस्थांमधील ४५ विद्यार्थी चित्रपट दाखवले जातील. नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडियाकडून क्लासिक्स पॅकेज पुनर्संचयित केले आहे. देशाची प्रगती, विकास आणि समृद्धी दर्शवणारे अमृतकालमधील भारताच्या विशेष थीमवर स्पर्धात्मक चित्रपटही आहेत. अपंगत्व पॅकेजमध्ये दृष्टिहीनांसाठी ऑडिओ वर्णन आणि सांकेतिक भाषेतील वर्णन असलेल्या चित्रपटांचा समावेश आहे आणि श्रवणदोषांसाठी क्लोज कॅप्शन्स आहेत.