मुंबई : केवळ १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरील निर्बंधच नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्यामागे घालण्यात आलेले जागेचे बंधनही कोचिंग क्लास चालकांकरिता अडचणीचे ठरणार आहे. खासकरून जागेची चणचण असलेल्या मुंबई-ठाण्यासारख्या शहरांमधील क्लास चालकांना ही अट सर्वाधिक तापदायक वाटते आहे. मुंबईतील ३० हजार कोचिंग क्लास चालक या अटीमुळे अडचणीत येणार आहेत.
केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने क्लास चालकांकरिता ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रति विद्यार्थी क्लासमध्ये किमान एक चौरस मीटर जागा असणे बंधनकारक आहे. या तत्त्वाचे पालन करायचे ठरविल्यास क्लासमधील विद्यार्थ्यांची क्षमता निम्म्यावर आणावी लागेल किंवा भाड्याने जागा घ्यावी लागेल.
हे मुद्दे अस्पष्ट :
फी योग्य आणि वाजवी असणे आवश्यक आहे. शुल्क वाजवी आहे हे कोण आणि कसे ठरवणार? कोणतीही दिशाभूल करणारी जाहिरात नाही. दिशाभूल म्हणजे नक्की काय? वर्ग सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा घेऊ नये. - नेमके किती लवकर आणि किती उशिरा?
नियमावलीत अस्पष्टता :
नियमावली ठरवून देण्याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण विभागाने राज्य सरकारवर टाकली आहे.
पर्याय न परवडणारे :
हे दोन्ही पर्याय आम्हाला परवडणारे नाहीत, असे ‘महाराष्ट्र क्लास चालक ओनर्स असोसिएशन’चे (एमसीओए)अध्यक्ष प्रजेश ट्रोट्स्की यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मात्र, या नियमावलीतील काही मुद्यांबाबत अस्पष्टता आहे. मार्गदर्शक तत्त्वांमधील काही मुद्यांबाबत अस्पष्टता असल्याने राज्यातील क्लास चालक संघटनांनी अद्याप तरी कुठली भूमिका घेतलेली नाही. ‘आग प्रतिबंधक उपाययोजन, समुपदेशनाची सुविधा, फीचा परतावा याबाबतचे नियम आम्हाला मान्य आहेत, मात्र इतर अन्य अटींबाबत आम्हाला स्पष्टता हवी आहे,’ अशी मागणी ट्रोट्स्की यांनी केली.
मुंबई-ठाण्यासारख्या ठिकाणी मालकीची जागा फार कमी क्लास चालकांकडे आहे. बहुतांश क्लासेस भाड्याच्या जागेत चालतात. प्रति विद्यार्थी एक चौरस मीटर जागेनुसार क्लासेस चालवायचे म्हटले तर खर्च वाढणार, तसेच त्या प्रमाणात शुल्कही वाढवावे लागेल. दुसरीकडे शुल्क पालकांना परवडणारे असावे, असेही बंधन आहे.