Join us

झाडे पडून झालेल्या 'त्या' दुर्घटनांची चौकशी होणार, मुंबई महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

By जयंत होवाळ | Published: July 12, 2024 10:25 PM

मे महिन्यात अशाच एका दुर्घटनेत एकाच मृत्यू झाला होता, तर एकजण जखमी झाला होता. या घटनांची गंभीर दखल पालिकेने घेतली आहे.

 

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात झाड पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली असून पडलेल्या झाडांचे सर्वेक्षण झाले होते का , ती झाडे धोकादायक होती का, याचा तपास केला जाणार आहे. त्याचबरोबर वृक्ष छाटणीच्या कामांची चौकशी होणार असल्याचे समजते. या महिन्यात वरळी येथे झाड अंगावर पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी परळ येथे झाड पडून एका कचरा वेचक महिलेचा मृत्यू झाला होता.

मे महिन्यात अशाच एका दुर्घटनेत एकाच मृत्यू झाला होता, तर एकजण जखमी झाला होता.  या घटनांची गंभीर दखल पालिकेने घेतली आहे. झाडे पडून प्राणहानी होण्याच्या घटनेचे पडसाद नुकत्याच झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीतही उमटले होते. जी झाडे पडून दुर्घटना घडली, ती झाडे धोकादायक होती का, त्यांचे सर्वेक्षण झाले होते का, ती कमकुवत होती का, धोकादायक झाली होती का, याची चौकशी केली जाणार आहे. या घटनांची चौकशी संबंधित सहाय्यक आयुक्त करणार आहेत.

पालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी झाडांचे सर्वेक्षण केले जाते. कोणती  झाडे कमकुवत आहेत, कोणती झाडे पडण्याच्या स्थितीत आहेत, कोणती धोकादायक आहेत , कोणत्या झाडांच्या फांद्या अतिरिक्त वाढल्या आहेत, मुसळधार पाऊस झाला किंवा सोसाट्याचा वारा  आल्यास कोणती झाडे तग धरू शकत नाहीत, याचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर विभाग स्तरावर झाडांची छाटणी किंवा ती तोडण्याचा निर्णय होतो. असे सर्वेक्षण झाल्यानंतरही दुर्घटना घडल्याने चिंतेचा विषय बनला आहे. पालिका दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त  झाडांच्या फांद्यांची छाटणी करते. यंदाही हे काम पूर्ण झाले आहे.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामृत्यूपाऊस