मुंबई : बुली बाई ॲप प्रकरणातील तिन्ही आरोपींनी स्त्रीत्वाची बदनामी केली आहे आणि समाजाच्या व्यापक हितासाठी या तिघांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर रोख लावणे आवश्यक आहे, असे म्हणत वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तिन्ही आरोपी विद्यार्थ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.मुस्लीम समाजातील काही महिलांची माहिती तपशिलात देऊन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न बुली बाई ॲपद्वारे करण्यात आला. या महिलांचा लिलावही या ॲपद्वारे करण्यात आला. आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंग आणि मयांक रावत या तिघांचा जामीन वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. शुक्रवारी आदेशाची प्रत उपलब्ध करण्यात आली. ‘यात शंका नाही की आरोपी अल्पवयीन विद्यार्थी आहेत आणि त्यांना जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. परंतु ते अधिकार वाजवी निर्बंधांच्या अधीन आहेत.’ अजामीनपात्र गुन्ह्याशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे त्यांची अटक कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारी नाही, असे दंडाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. ‘त्यांनी स्त्रीत्वाला बदनाम करणारे गंभीर कृत्य केले आहे. समाजाचे हित धोक्यात आले आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य रोखले गेले, असे म्हणता येईल,’ असे न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळताना म्हटले. एखाद्या विशिष्ट धर्माच्या महिलांबद्दल माहितीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तींचा चुकीचा हेतू आहे. प्रथमदर्शनी, आरोपींचा त्यात सहभाग आहे, असे न्यायालयाने म्हटले. आरोपी विशाल कुमार झा याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Bulli Bai App Case: आरोपींनी स्त्रीत्वाचा अपमान केला; तिन्ही आरोपी विद्यार्थ्यांचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 9:07 AM