‘आरोपी हा तरुण, तुरुंगात खितपत ठेवणे योग्य नाही’; सत्र न्यायालयाकडून १९ वर्षीय तरुणाला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 02:41 PM2023-10-12T14:41:56+5:302023-10-12T14:42:52+5:30
तक्रारदाराला लोखंडी रॉड तसेच बांबूंनी मारहाण केल्याचा आरोप असून याप्रकरणी सुटका व्हावी यासाठी आरोपी तरुणाने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला.
मुंबई : दीड हजार रुपये दिले नाही म्हणून बहिणीच्या मित्राला मारझोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. आरोपी हा १९ वर्षीय तरुण मुलगा आहे. त्याला तुरुंगात खितपत ठेवणे योग्य नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
पैसे दिले नाही म्हणून मारझोड प्रकरणी तरुणाला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. तक्रारदाराला लोखंडी रॉड तसेच बांबूंनी मारहाण केल्याचा आरोप असून याप्रकरणी सुटका व्हावी यासाठी आरोपी तरुणाने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला.
या अर्जावर न्यायाधीश राजेश सासणे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. आरोपी हा तरुण असून त्याच्यावर यापूर्वी कोणतीही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच त्याला खटल्या दरम्यान तुरुंगात डांबून ठेवण्यात अर्थ नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन दिला.