घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या; वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 01:48 PM2023-08-02T13:48:36+5:302023-08-02T13:49:02+5:30
आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल करून काही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी दिली आहे.
नालासोपारा : घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश मिळाले आहे. आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल करून काही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी दिली आहे.
बाभोळा येथील पुष्कर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या समिता विश्वास मोरे यांच्या घरातून १७ जुलैला संध्याकाळी चोरट्यांनी चांदीचे दागिने चोरले होते. या प्रकरणी वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मागील काही दिवसांमध्ये वसई पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. यास आळा घालून दाखल गुन्ह्यांची लवकर उकल करण्यासाठी वरिष्ठांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दोन पथके तयार करून तपास चालू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी राकेश मस्तान याला ताब्यात घेतले. तपास केल्यावर आरोपीने गुन्हा केल्याचे उघड झाल्यावर अटक केली.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली वसईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित आंधळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) हृषीकेश पवळ, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राम सुरवसे, सुनील पवार, पोलिस हवालदार सुनील मलावकर, मिलिंद घरत, सूर्यकांत मुंढे, अक्षय नांदगावकर यांनी केलेली आहे.