अभिनयातील हिमालय होते विक्रम गोखले - मनोज जोशी

By संजय घावरे | Published: October 31, 2023 03:35 PM2023-10-31T15:35:48+5:302023-10-31T15:36:13+5:30

वृषाली गोखलेंच्या उपस्थितीत विक्रम गोखलेंचा वाढदिवस साजरा

The acting Himalayas were Vikram Gokhale - Manoj Joshi | अभिनयातील हिमालय होते विक्रम गोखले - मनोज जोशी

अभिनयातील हिमालय होते विक्रम गोखले - मनोज जोशी

मुंबई - कलाकार म्हणून विक्रम गोखले ग्रेट होतेच, पण माणूस म्हणूनही महान होते. माझ्यासाठी ते अभिनयातील हिमालय आहेत. कलाकार म्हणून आपले काही दायित्व, काही कर्तव्य असते, समाजाचे काही देणे असल्याचे भान राखून त्यांनी काम केल्याची भावना अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केली. विक्रम गोखलेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनोज जोशी बोलत होते. 
 
विक्रम गोखलेंच्या पश्चात त्यांचा वाढदिवस काहीशा अनोख्या शैलीत साजरा करण्यात आला. त्यांच्या जाण्याचे दु:ख न करता कलाकृतींच्या माध्यमातून ते अजरामर असल्याच्या भावनेतून त्यांच्या पत्नी वृषाली गोखले यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यासोबतच गोखलेंच्या पश्चात प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी गोखलेंच्या आठवणींना उजाळा दिला.

या सोहळ्याला मनोज जोशींसोबत महेश मांजरेकर, सुहासिनी मुळ्ये, मेघना नायडू, रीना मधुकर, दिग्दर्शक प्रवीण बिरजे, लेखक आशिष देव, प्रस्तुतकर्ते रतीश तावडे, अश्विन पांचाळ, देवांग गांधी आदी मंडळी उपस्थित होती. मनोज जोशी म्हणाले की, विक्रम चंद्रकांत गोखले यांना आमची पिढी विक्रमकाका म्हणूनच ओळखते. मी त्यांना देव, आदर्श आणि काका म्हणतो. ते मला त्यांचा मानसपुत्र मानायचे. उत्तुंग अभिनयामुळे ते नाटक-सिनेमाच नव्हे, तर कोणत्याही माध्यमातील हिमालयच आहेत. विक्रमकाकांचा हा शेवटचा सिनेमा आहे. यात मी काम केले नसले तरी काकूंच्या शब्दाखातर आज आलो. विक्रमकाका हे सिने टिव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे (सिंटा) शेवटपर्यंत अध्यक्ष होते. कलाकारांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि सिंटाला प्रत्येकी एक एकर जमिन दान दिली आहे. त्यांची उत्तुंगता केवळ अभिनयाचीच नव्हती. समाजकार्यात, निर्भिड बोलण्यात आणि पक्का विचार मांडण्यात ते अव्वल होते. आमची अख्खीच्या अख्खी पिढी त्यांच्यासारखा अभिनय करता यावा यासाठी त्यांच्याकडे पाहून एकलव्याप्रमाणे शिकत होती. त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लाँच करण्यासाठी मला बोलावले हे माझे भाग्य समजतो असेही जोशी म्हणाले.

सुहासिनी मुळ्ये म्हणाल्या की, आज मीडियात घडणाऱ्या गोष्टींचा सूर विक्रम गोखलेंच्या अखेरच्या सिनेमात लागला आहे. विक्रमजींसोबत काम करायला मिळणे हा सन्मान होता. करियरच्या या टप्प्यावर त्यांच्यासोबत काम करताना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याने सुरेल लागलेला माझा अभिनयातील सूर प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळेल.

Web Title: The acting Himalayas were Vikram Gokhale - Manoj Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.