जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, मंत्री सामंतांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 05:10 PM2022-11-11T17:10:53+5:302022-11-11T17:11:23+5:30

जितेंद्र आव्हाड यांनी शो बंद पाडल्यानंतर ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले,

The action against Jitendra Awha is legal, Minister Uday Samant clearly said | जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, मंत्री सामंतांनी स्पष्टच सांगितलं

जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, मंत्री सामंतांनी स्पष्टच सांगितलं

Next

मुंबई - हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पडला होता. याप्रकरणी १०० कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर, ठाणे पोलिसांनी आज जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली. तर, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री उदय सामंत यांनी ही अटक कायदेशीरच असल्याचं म्हटलं आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी शो बंद पाडल्यानंतर ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, तसेच कोण जितेंद्र आव्हाड असा सवाल केल्याने, संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली होती. मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता त्यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर करण्यात आलेली अटक ही कायदेशीर कारवाई आहे, असे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. या बाबतीत राजकीय स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. कारण, विवियाना मॉलमध्ये एका तरुणाला त्याच्या कुटुंबासमोर मारहाण झाली होती, ही बाब आपण सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे, त्यावरुन करण्यात आलेली ही कारवाई असल्याचंही सामंत यांनी म्हटलं. 

जेल भरो आंदोलन करणार - सुळे

महाराष्ट्रातील पोलीस अतिशय कर्तव्यदक्ष असून देशात आदर्श निर्माण करणारी पोलीस आहे. या पोलिसांना वरुन दबाव आल्याचं दबक्या आवाजात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. मात्र, ज्या कारणासाठी जितेंद्र आव्हाड यांना पोलीस ठाण्यात बोलावलं आणि त्यांना अटक करण्यात येत आहे, त्यासाठी मी त्यांच्या अटकेचं स्वागत करते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देवाप्रमाणे आहेत, जर शिवाजी महाराजांबद्दल कोणी चुकीचं सांगत असेल आणि त्याविरुद्ध जितेंद्र आवाज उठवत असतील, त्यामुळेच हे सरकार आव्हाड यांना तुरुंगात टाकत असेल तर आम्ही सगळेच तुरुंगात जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करू, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिला आहे. महाराष्ट्राची आन, बाण, शान आणि आमचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांबद्दल जे चुकीचं दाखवण्यात येत आहे, त्याचं जर हे सरकार समर्थन करत असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे. 

अटकेनंतर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

यासंदर्भात स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पाठोपाठ एक असे तीन ट्विट केले आहेत, यात त्यांनी लिहिले आहे, "आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.

फाशी दिली तरी चालेल, पण...

यानंर आणखी एका ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले, "हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही."

Web Title: The action against Jitendra Awha is legal, Minister Uday Samant clearly said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.