मार्चमध्ये ठरला ॲक्शन प्लॅन, ऑक्टोबरमध्ये कारवाईला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 09:50 AM2023-10-17T09:50:00+5:302023-10-17T09:50:11+5:30

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी आता अश्विनी जोशी यांनी सूत्रे हातात घेतली

The action plan was decided in March, the action started in October | मार्चमध्ये ठरला ॲक्शन प्लॅन, ऑक्टोबरमध्ये कारवाईला सुरुवात

मार्चमध्ये ठरला ॲक्शन प्लॅन, ऑक्टोबरमध्ये कारवाईला सुरुवात

- सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : धूळ नियंत्रित करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या आदेशानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये सात कलमी कार्यक्रम जाहीर केला. एप्रिल मध्ये तीन कृती दले स्थापन झाली. बांधकामांच्या ठिकाणी त्रुटी आढळल्यास, नियमांचे पालन न करणाऱ्या विकासक, कंत्राटदारावर कारवाई असे स्वरूप ठरले. पण त्याची नियमावली करण्याचे आदेश काढायला पालिकेला नऊ महिने लागले आहेत. आता नियमावली, शिक्षेच्या तरतुदी करण्याचे काम सुरू होईल.
पालिकेने स्वच्छ हवा कार्यक्रम तयार केला, तेव्हा डॉ. संजीव कुमार अतिरिक्त आयुक्त होते. त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी आलेले डॉ. श्रावण हर्डीकर दीड महिन्यातच बदलून गेले. त्यामुळे नऊ महिने रखडलेले काम मार्गी लावण्याची जबाबदारी काही दिवसापूर्वी आलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे आली आहे. 

त्यांनीच आता पुढाकार घेत या कामाला वेग देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी झालेल्या बैठकीत खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तात्काळ उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कठोर कारवाई करण्यावर चर्चा झाली. वॉर्डस्तरावर टास्क फोर्स, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक नेमा, त्यात सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अभियंते यांचा समावेश करा, असे आदेश आयुक्त आय. एस. चहेल यांनीही दिले आहेत.

 शाश्वत, स्वच्छ बांधकाम व निष्कासन पद्धतीत बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अटी आणि बांधकामाच्या ठिकाणी धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व्यवसायाकरिता मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करावे लागेल.
 रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी उपाययोजना.
 वाहतुकीचे शाश्वत आणि पर्यावरण स्नेही उपाययोजना केली जाणार.
 शाश्वत कचरा व्यवस्थापन उपाययोजना राबवली जाणार.
 पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शहरी प्रकल्प हाती घेतले जाणार.
 प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी देखरेख केली जाणार.
  प्रदूषण कमी करण्यासाठी संपर्क व जागरूकता मोहिमा राबवल्या जाणार.

कृती आराखडा कार्यालयात बसून बनविणे सोपे आहे. प्रत्यक्षात जिथे त्रास होतो. जिथे खूप प्रदूषण आहे. लोक आजारी पडत आहेत. तिथे महापालिकेने काम केले पाहिजे. प्रदूषणाच्या तक्रारी कुठे करायच्या? हेच लोकांना माहीत नाही. पालिकेने लोकांना यावर बोलते केले पाहिजे. उपाययोजना कृतीमध्ये आणल्या पाहिजेत. त्याशिवाय प्रदूषण कमी होणार नाही.
- सुमेरा अब्दुलअली, 
संस्थापक, आवाज फाउंडेशन

पालिकेचा स्वच्छ हवा उपक्रम हा मुंबईच्या वातावरणासाठीचा लाँग टर्म प्लान आहे. सध्या पालिका वाढत असणाऱ्या धूळ, धूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनावर लक्ष देत आहे. यासाठी आणखी एक बैठक होणार असून, या संदर्भातील सूचना आम्ही जाहीर करू.
- अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका

Web Title: The action plan was decided in March, the action started in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.