Join us  

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याकरिता प्रशासन सज्ज

By मनोहर कुंभेजकर | Published: November 02, 2022 7:52 PM

महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

मुंबई :

महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधी दरम्यान होणारी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज असून याकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. तसेच या अनुषंगाने अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदार केंद्रावर वेळेत पोहचून आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजवावा आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही कर्तव्य ज़रुर पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. 

अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा भाग म्हणून गुरुवारी होणाऱ्या मतदानासंदर्भात मुंबई उपनगरच्या वांद्रे पूर्व  जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अजित साखरे हे उपस्थित होते..या मतदार संघात पुरुष मतदार  १ लाख ४६ हजार ६८५ असून महिला मतदार १ लाख २४ हजार ८१६, दिव्यांग मतदार : ४१९ तर तृतीय पंथीय मतदार: १ (एक) आहे. तर एकूण मतदार  २ लाख ७१ हजार ५०२ आहेत. एकूण मतदान केंद्रे : २५६ असून  ही मतदान केंद्रे ३८ ठिकाणी कार्यरत असून    २५६ मतदान केंद्रांपैकी २३९ मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर असून उर्वरीत १७ मतदान केंद्रे ही पहिल्या मजल्यावर आहे. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी उद्वाहन अर्थात लिफ्ट ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व ठिकाणी व्हिल चेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

सखी मतदान केंद्र : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अंधेरी पूर्व परिसरातील मरोळ मरोशी मार्गावर असणाऱ्या मरोळ एज्यूकेशन अकादमी हायस्कूल येथे असणारे मतदान केंद्र क्रमांक ५३ हे सखी मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रामध्ये एकूण १ हजार ४१८ मतदार असून यापैकी ७२६ महिला; तर उर्वरित ६९२ मतदार हे पुरुष आहेत. या केंद्रातील महिला मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सजविण्यात आलेल्या या मतदान केंद्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी महिला असणाार आहेत.

या पोटनिवडणूकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये  ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे), बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स, मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी), नीना खेडेकर (अपक्ष), फरहाना सिराज सय्यद (अपक्ष), मिलिंद कांबळे (अपक्ष), राजेश त्रिपाठी (अपक्ष) हे ७ उमेदवार पोटनिवडणूकीच्या रिंगणात आहेत.

कायदा व सुव्यवस्था : मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था सुयोग्य प्रकारे राहावी , यासाठी सुमारे १ हजार १०० इतके अधिकारी / कर्मचारी कार्यरत असणार आहे. यामध्ये मुंबई पोलिस दल, राखीव पोलिस दल, निमलष्करी दल , गृह रक्षक दल इत्यादींच्या मनुष्य बळांचा समावेश असणार आहे. 

अंधेरी पूर्व मतदार संघातील ९९.९६ टक्के मतदारांकडे भारत निवडणूक आयोगाद्वारे जारी करण्यात आलेले मतदार ओळखपत्र अर्थात EPIC कार्ड आहेत. ही बाब लक्षात घेता अंधेरी पूर्व मतदार संघातील सर्व मतदारांना आवाहान करण्यात येत आहे की, त्यांनी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान अवश्य करावे आणि मतदानाला जाताना आपले EPIC कार्ड आठवणीने सोबत घेवून जावे. 

सार्वजनिक सुट्टी  दि. ३ नोव्हेंबर  रोजी होणाऱ्या मतदानासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी उद्या दि, ३ नोव्हेंबर  रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुट्टी '१६६ - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.