Join us  

हार्बर मार्गावर संथ प्रवासाचा मनस्ताप; सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवास नकोसा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:55 AM

हार्बर मार्गात अद्याप हव्या तशा सुधारणा नसल्याने त्याचा त्रास प्रवाशांना होतो.

श्रीकांत जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जुने रेल्वे रूळ, वारंवार बिघडणारी सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामात आधुनिकतेच्या अभावामुळे वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर रेल्वे मार्गावर अस्वच्छ वातावरणात संथ गतीत करावा लागणारा रेल्वे प्रवास मुंबईकरांसाठी मनस्ताप वाढवणारा आहे. हार्बर मार्गात अद्याप हव्या तशा सुधारणा नसल्याने त्याचा त्रास प्रवाशांना होतो. उपनगरीय रेल्वे प्रवासात वांद्रे येथून सीएसएमटी आणि वाशीकरिता रेल्वे सोडल्या जातात. त्यातून दिवसाला लाखो मुंबईकर प्रवास करतात. मात्र आजही येथील सर्वच रेल्वे स्थानकांवर अस्वच्छता असते. 

कोंदट वातावरण, तृतीयपंथीयांचा वावर,   भिकारी-बेघर लोकांचे स्थानकांवरील आश्रयस्थान, अनधिकृत फेरीवाल्यांचा भर गर्दीत होणारा वावर आणि वारंवार रेल्वे सिग्नल यंत्रणेमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे प्रवास नकोसा होतो. विशेष म्हणजे या मार्गावर अनेक गाड्या जुन्या डब्यांच्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे डब्यात पाणी गळणे, दरवाजे न लागणे असे अनेक प्रकार गर्दीच्यावेळी होत असतात. त्यामुळे स्वतःचा जीव आणि कपडे, वस्तू सांभाळत मुंबईकरांना हार्बर रेल्वे मार्गातील कुबट, अस्वच्छ आणि संथ गतीने धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणे खूप त्रासदायक होत असल्याचे हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईरेल्वे