काळजी घ्या! हवेचा दर्जा घसरला; प्रदूषणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 07:52 AM2022-12-09T07:52:30+5:302022-12-09T07:53:34+5:30

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात घसरली आहे. धुरक्याचे साम्राज्य मुंबई आणि परिसरावर पसरले आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे

The air quality in Mumbai has deteriorated even more than Delhi | काळजी घ्या! हवेचा दर्जा घसरला; प्रदूषणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले

काळजी घ्या! हवेचा दर्जा घसरला; प्रदूषणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले

Next

संतोष आंधळे 

मुंबई - मुंबईच्या वातावरणात पसरलेल्या धुलीकणांनी मुंबईकरांच्या नाकीनऊ आणले असून, गुरुवारी तर मुंबईची हवा दिल्लीच्या तुलनेत कित्येक पटींनी प्रदूषित नोंदविण्यात आली आहे. मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३१५, तर दिल्लीचा २६२ एवढा नोंदविण्यात आला आहे. परिणामी आता मुंबईने प्रदूषणाबाबत दिल्लीलाही मागे टाकले असून, उत्तरोत्तर वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास गुदमरू लागला आहे.

हवा का बिघडते ?
मुंबईची भौगोलिक रचना यास जबाबदार आहे. मुंबई एक बेट आहे. प्रथमत: मुंबई समुद्र सपाटीला असून, शहरातील हवेच्या गुणवत्तेला इतर हवामान घटकांबरोबरच परिणाम करणारे अत्युच्च हवेचा दाब, खाऱ्या वाऱ्यांचा हंगामानुसार होणारा वहन वेग बदल या दोन बाबी मुख्यत्वे जबाबदार आहेत. 

पूर्व गुजरात व पश्चिम मध्य प्रदेशमार्गे काश्मीर, पंजाब, राजस्थानाची थंडी कमी वेळात मुंबईत दाखल होते. ही थंडी समुद्रसपाटीमुळे हवेच्या उभ्या खांबाला मिळालेली अधिक उंची व त्यामुळे उच्च हवेचा दाब तयार होतो. थंडीमुळे हवेला अधिक घनता मिळते. हवा जमिनीलगतच खूप उंचीपर्यंत खिळून राहते. थोडक्यात त्याचे एक घट्ट पार्सल (गाठोडे) तयार होते. त्यामुळे प्रदूषित धुलीकण व सकाळचे धुके दोघांच्या मिश्रणातून स्मॉग कण संथ वा-यात अडकून पडतात आणि नाकाद्वारे शरीरात जाऊन श्वसनविकार जडवतात. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ. 

प्रदूषित हवेचा डोक्यावर परिणाम, मेंदूतील पेशी होतात बाधित, तज्ज्ञांचे मत

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात घसरली आहे. धुरक्याचे साम्राज्य मुंबई आणि परिसरावर पसरले आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते प्रदूषित हवेचा परिणाम केवळ श्वसनावरच नव्हे तर मेंदूच्या पेशींवरही होतो. त्यामुळे स्मरणशक्ती आणि विश्लेषणात्मक विचार प्रक्रिया बाधित होते. 

अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनमधील एका संशोधन लेखानुसार गेल्या दशकभरात, संशोधकांना असे आढळून आले की, वायू प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच प्रौढांमध्येही याचा धोका वाढू शकतो. प्रदूषणाचे नैराश्यही वाढू शकते. सद्य:स्थितीत राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा कमालीची खराब झाली आहे.  

प्रदूषित हवेचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मुले आणि प्रौढांमध्ये झोपेच्या समस्या उद्भवतात. अशा वातावरणामुळे मुले रागीट होतात. फुप्फुसांत प्रदूषित हवा गेल्याने ती मेंदूपर्यंत पोहोचते. त्याचा परिणाम मेंदूच्या पेशींवर होते. त्यामुळे विविध मानसिक आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. - डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ

प्रदूषित हवेमुळे तणाव, नैराश्य येते किंवा मुलांमध्ये चिडचीड वाढते. मुलांच्या एकाग्रता भंगते. त्यांच्यात चंचलवृत्ती वाढीस लागते. संवेदनशीलता वाढल्याने नागरिक धोकादायक वर्तनात गुंतण्याची शक्यता असते, त्यामुळे आत्महत्येचा धोका अधिक वाढू शकतो. कधी बौद्धिक मांद्य आल्याने लोकांच्या हातून चुका होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे छोटेमोठे अपघात घडू शकतात. हवेतील उच्च प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेच्या समस्या वाढून परीक्षेत कमी गुण मिळवतात. - डॉ. शुभांगी पारकर, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

 

Web Title: The air quality in Mumbai has deteriorated even more than Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.