आहाेम राजघराण्याचा प्राचीन वारसा ‘माेईदम्स’चे आता हाेणार जतन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 05:34 AM2024-07-27T05:34:49+5:302024-07-27T05:35:05+5:30
युनेस्काेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यामुळे हाेणार फायदा; पर्यटन वाढणार, रोजगार मिळणार
- मनाेज रमेश जाेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आसाममधील आहाेम राजघराण्यातील लाेकांची स्मृतिस्थळे असलेल्या ‘माेईदम्स’चा युनेस्काेच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला. आसाममधील नागरिकांच्या अस्मितेच्या दृष्टिकाेनातून हा फार माेठा निर्णय आहे. जागतिक वारसास्थळ म्हणून घाेषित झाल्यामुळे ‘माेईदम्स’चे संरक्षण आणि जतन करण्यासाठी फार माेठी मदत हाेणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
सध्या असलेल्या आसामवर अहाेम राजवंशाचे १३व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत शासन हाेते. अहाेम हे १३व्या शतकात वर्ष १२१५ च्या आसपास माेंग-माओ (सध्याच्या चीनमधील युआन प्रांत) येथून स्थलांतरित झाले. ‘ताई’ ही त्यांची भाषा हाेती. त्यातूनच ‘माेईदम’ या शब्दाची निर्मिती झाली. चाओलुंग चाैकाफा पहिला आहाेम राजा हाेता. त्याने स्थानिक जमाती व टाेळ्यांना एकत्र आणले आणि आहाेम राज्याची स्थापना केली.
अहाेम वंशीयांमध्ये मृत्यूनंतर अग्नी देण्याची परंपरा नव्हती. त्यावेळी राजाच्या मृत्यूनंतर त्यांचे दफन करण्यासाठी पिरामिडसारखी रचना असलेले अर्धवर्तुळाकार आकाराचे ‘माेईदम’ उभारण्यात येत असे. प्रत्येक आहाेम राजा त्याच्या जिवंतपणीच ‘माेईदम’ तयार करून ठेवायचा. चराईदेव ही आहाेम राज्याची पहिली राजधानी हाेती. येथे सुमारे ६०० वर्षांपूर्वीचे हे बांधकाम असून ९५.०२ हेक्टर परिसरात ते आहे. राजाच्या पार्थिवासाेबतच त्यांनी वापरलेल्या वस्तू, दागिने, माैल्यवान रत्ने, शाही प्रतीक चिन्ह, शस्त्र इत्यादी वस्तू विशिष्ट कक्षात ठेवण्यात आल्या हाेत्या. या माेल्यवान वस्तू इंग्रजांनी लुटून नेल्या.
निर्णय महत्त्वाचा का?
nमाेईदम्स हे आसामच्या प्राचीन संस्कृतीचे प्रतीक आहे. तिचे संरक्षण करणे तसेच सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मदत हाेणार आहे.
nपर्यटनात वाढ हाेणार असून त्यामुळे स्थानिकांना माेठ्या प्रमाणात राेजगार उपलब्ध हाेतील.